बुलढाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – समृद्धी महामार्गावर शनिवारी रात्री खासगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला आहे. नागपूरहून पुण्याकडे जाणारी ही बस पलटी झाली आणि तिने पेट घेतला. पोलिस उपायुक्त बाबुराव महामुनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये ३३ प्रवासी होते. त्यापैकी २६ जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. त्याच वेळी, या अपघातातून बचावलेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी म्हणाले..
प्रवाशांचा जिवंत जळून मृत्यू झाला आहे. त्यामुळे बसच्या सांगाड्यात केवळ मृतदेहांचा कोळसा आढळला आहे. परिणामी, मृतांची ओळख पटत नाही. म्हणूनच मृतदेहांची डीएनए चाचणी केली जाईल, त्यानंतर सर्व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले जातील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पोलिस उपअधीक्षक बाबुराव महामुनी यांनी याबाबत माहिती दिली आहे. शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास ही घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. बसमधून 25 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बसमध्ये एकूण 33 जण होते. मृतांमध्ये तीन मुलांचाही समावेश आहे.
बस चालकाचा दावा
या अपघातात सहा ते आठ जण जखमी झाले आहेत. अपघाताचे नेमके कारण सध्या तरी समजू शकलेले नाही. जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. बसचा चालकही बचावला असून टायर फुटल्यानंतर बस उलटली, त्यामुळे बसने पेट घेतला. असा दावा त्याने केला आहे.
नेमकं काय झालं
नागपूरहून औरंगाबादकडे जाताना बस प्रथम उजव्या बाजूला असलेल्या लोखंडी खांबाला धडकली, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. यादरम्यान बस रस्त्याच्या मधोमध बांधलेल्या काँक्रीटच्या दुभाजकावर आदळली आणि पलटी झाली. बस डावीकडे पलटी झाल्याने बसचा दरवाजा खाली आल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अशा स्थितीत त्यात बसलेल्या लोकांना वाहनातून बाहेर पडता येत नव्हते. अपघातादरम्यान बसमधील डिझेल मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पसरल्याचेही सांगण्यात येत आहे. डिझेल सांडल्यामुळे बसला आग लागली.
बसमालक म्हणतो
या घटनेबद्दल शोक व्यक्त करताना बसचे मालक वीरेंद्र दारणा यांनी सांगितले की, ही त्यांच्या कुटुंबाची बस होती. २०२० मध्ये ती घेतली होती. परिपूर्ण कागदपत्रांसह ही बस अगदी नवीन आहे. बसचा चालकही खूप अनुभवी आहे. चालकाच्या म्हणण्यानुसार, टायर फुटल्यानंतर बस दुभाजकावर चढली आणि अत्यंत ज्वलनशील पदार्थाने पेट घेतला. आमच्या यादीनुसार, बसमध्ये सुमारे २७ प्रवासी होते.
शिंदे-फडणवीस भेट देणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना त्यांनी पाच लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोड्याच वेळात घटनास्थळी भेट देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.