बुलढाणा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – समृद्धी महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला आहे. त्याची तत्काळ दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले आहे. मृतांच्या वारसांना ५ लाख रुपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली आहे. तसेच, या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गावर खाजगी बसच्या झालेल्या भीषण अपघाताबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. या अपघातातील मृत आणि त्यांच्या कुटुंबिंयांप्रति सहवेदना प्रकट करुन या दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. या भीषण अपघाताने आपण व्यथित झाल्याची भावना व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश ही दिले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुलढाण्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून या घटनेची माहिती घेतली. अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याच्या सूचना देतानाच जखमींना शासकीय खर्चाने तात्काळ वैद्यकीय उपचार पुरविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. दुर्घटनेची माहिती कळताच तातडीने महामार्गासाठी तैनात आपत्कालीन वैद्यकीय सेवा पथक तसेच अग्निशमन दल त्याठिकाणी पोहचले आणि त्यांनी बचाव कार्य सुरु केले. जखमी प्रवाशांना काढून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले…
विदर्भ ट्रॅव्हल्सच्या पुणे येथे जाणाऱ्या एका खाजगी बसला बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळखुटा येथे अपघात होऊन 25 जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि मनाला वेदना देणारी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या घटनेत 8 जण जखमी झाले असून त्यांना सिंदखेडराजा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती धोक्याबाहेर आहे.
या अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक मदत मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जाहीर केली आहे. जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करेल.
जिल्हा तसेच पोलिस प्रशासनाशी आम्ही संपर्कात असून तातडीने सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून दिली जात आहे. पोलिस अधीक्षकांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही बस एका पुलावर आदळली आणि त्यानंतर डिझेल टाकी फुटल्याने वाहनाला आग लागली.
अमित शाह म्हणाले…
महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील रस्ता अपघात हृदयद्रावक आहे. या दु:खाच्या घडीमध्ये या भीषण अपघातात ज्यांनी प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांसोबत माझे विचार आहेत. प्रशासनाकडून जखमींवर त्वरित उपचार केले जात आहेत. त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो.