मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नागपूरहून पुण्याला येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला समृध्दी महामार्गावर बुलडाणा – सिंदखेडराजा येथे अपघात होऊन २५ हून अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद, वेदनादायी आहे. समृध्दी महामार्गावर बसचा टायर फुटल्याने बस दुभाजक व खांबाला धडकली आणि बसने पेट घेतला. या भीषण दुर्घटनेनंतर समृध्दी महामार्गावरील वाहनांच्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा प्रकर्षाने ऐरणीवर आला आहे. अशा अपघातांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून राज्य शासनाने तज्ज्ञांच्या सल्ल्याने यावर तात्काळ उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.
दरम्यान आजच्या भीषण बस दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या प्रवाशांना अजित पवार यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. शिवाय दुर्घटनेत जखमी प्रवाशांना शासनामार्फत चांगले उपचार मिळून ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थनाही केली. समृद्धी महामार्गावर सुरुवातीपासून अपघातांची मालिका सुरु आहे. या अपघातात अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. समृद्धी महामार्गाच्या सदोष निर्मितीमुळे आणि मानवी त्रुटींमुळे हे अपघात घडत असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणीही विरोधी पक्षांच्यावतीने सातत्याने करण्यात आली आहे. शासनाने आतातरी या मागणीचा गांभीर्याने विचार करावा असे स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केले आहे.
शरद पवारांनी वाहिली श्रद्धांजली…
बुलढाणा येथील दुर्दैवी घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील खासगी वाहनांच्या वेगमर्यादेचा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत राज्य सरकारने गंभीर दखल घेत त्वरित उपाययोजना करायला हव्यात अशी मागणी करतानाच एक आठवड्यापूर्वीच संबंधित विभागाकडून होत असलेल्या अपघातांची आकडेवारी मागवून चिंता व्यक्त केली होती व अपघात रोखण्याच्यादृष्टीने तातडीच्या उपाययोजना कराव्यात असे सुचवले होते याची आठवण ट्वीट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला करुन दिली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा पिंपळखुटा भागात समृध्दी महामार्गावर लक्झरी बस उलटून भीषण अपघात झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे अशा शब्दात शोक व्यक्त करतानाच या अपघातात २५ प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली शरद पवार यांनी वाहिली व अपघातातील जखमींवर लवकरात लवकर उपचार होऊन ते बरे व्हावेत अशी प्रार्थनाही केली.