मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील अपघात नियंत्रणात आणण्यासाठी यापुढे सर्व मोठ्या वाहनांच्या चालकांची श्वास विश्लेषक चाचणी करण्यात येणार असल्याचे, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी आज विधानसभेत सांगितले. सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी अर्धा तास चर्चेदरम्यान समृद्धी महामार्गावरील होणारे अपघात याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
मंत्री श्री. भुसे म्हणाले की, या महामार्गावर दररोज किमान १७ ते १८ हजार वाहने प्रवास करतात. भविष्यात या महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे सर्व वाहनांना १२० किलोमीटर प्रती तास इतकी वेगमर्यादा घालण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेकरिता तसेच अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. अपघात होऊ नये यादृष्टीने परिवहन विभागातर्फे वाहन चालकांचे वेळोवेळी समुपदेशन केले जाते. वेग मर्यादा न पाळणाऱ्या वाहन चालकांना दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. आवश्यक दिशादर्शक चिन्हे, सूचना फलके, माहिती फलके, वेगमर्यादा दर्शक फलके लावणे, लेन मार्किंग करणे, उपाययोजना केलेल्या आहेत, असेही मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य हरिभाऊ बागडे, सुनील केदार यांनी सहभाग घेतला.
samruddhi highway accident vehicle driver test
maharashtra assembly monsoon session minister dada bhuse vidhansabha