नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकार्पणापासूनच समृद्धी महामार्गावर सुरू झालेले अपघातसत्र काही केल्या थांबायला तयार नाही. सुसाट वेगाने धावणाऱ्या गाड्यांचे दररोज अपघात होणे, या रस्त्यावर नवीन राहिलेले नाही. अशात राज्य सरकारने या मार्गावरील गाडी चालविणाऱ्या वाहनचालकांची अल्कोहोल टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने समृद्धीवरील अपघातसत्र थांबण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वीच एका खासगी ट्रॅव्हल बसचा समृद्धी महामार्गावर जोरदार अपघात झाला. त्यानंतर संपूर्ण सरकार हादरले आहे. या पार्श्वभूमीवर या मार्गावरील अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. अपघात रोखण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी बैठक घेतली. बैठकीनंतर बोलताना दादा भुसे म्हणाले,‘समृद्धी महामार्गावर आता लवकरच वाहन चालकांची अल्कोहल टेस्ट होणार असून, अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. तसेच काटेकोरपणे वाहतूक नियमांचे पालन करण्यासंबंधी पाऊल उचलली जाणार आहे.
आतापर्यंत समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातांमागे मानवी चुका असल्याचे आढळले आहे. आजवर समृद्धी महामार्गावर ३२ लाख वाहने धावली असून, त्यामुळे याकडे सुद्धा सकारात्मक दृष्टीने पाहायला हवे. काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर बुलढाणा येथील सिंदखेड राजा जवळ एका खाजगी बसचा अपघात झाला होता. या भीषण अपघातात २५ लोकांना आपला जीव गमवावा लागला. तर बुलढाणा जिल्ह्यातील बस अपघातात चालकाने मद्य प्राशन केल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांची अल्कोहोल टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’
भुसेंमुळे पोलिसांची दमछाक
मंत्री दादा भुसे समृद्धी महामार्गावरुन प्रवास करणार असल्याने जालन्यात देखील त्यांनी पाहणी केली. दरम्यान भुसे यांचा ताफा येण्याअगोदर समृद्धी महामार्गावर दोन श्वानांनी ठाण मांडले होते. भुसे यांचा ताफा यायला काही सेकंद शिल्लक असतानाच समृद्धी महामार्गावर दोन श्वान आल्याने पोलिसांची धावपळ उडाली. तर या श्वानांना हुसकवताना वाहतूक पोलिसांची दमछाक झाली.