नाशिकरोड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ऊर्जा सचिव व तिन्ही कंपन्यांचे व्यवस्थापनशी झालेली बैठकीतील चर्चा फिस्कटल्याने महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंते व कंत्राटी कामगार संघर्ष समितीने सोमवार (दि.२८) आणि मंगळवार (दि.२९) दोन दिवस संपावर जाण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. परिणामी ऊर्जा क्षेत्रातील हजारो कर्मचारी या दोन दिवसांच्या संपात उतरणार असून ऊर्जा विभागाचे कामकाज प्रभावित होणार आहे.
महाराष्ट्र शासनाचे उर्जासचिव यांच्या पातळीवर व तिन्ही कंपन्याचे व्यवस्थापकिय संचालकांचे उपस्थितीत वीज उद्योगातील संघर्ष समिती व कंत्राटी संघटना कृती समितीच्या ३९ पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी ऑनलाईन बैठक झाली. या दोन दिवसीय संपाची नोटीस शासनाला सर्व संघटनांनी ९ फेब्रुवारीला दिलेली असतांना दिड महिन्यापर्यंत या नोटिशीची दखल न घेता ऐन संपाच्या तोंडावर ऑनलाईन बैठक आयोजित केल्याने सर्व संघटना प्रतिनिधींनी व्यवस्थापनाच्या या असंवेदनशील कारभाराचा निषेध व्यक्त केला. शासन व व्यवस्थापन संपकरी कर्मचारी वर्गाच्या मागण्या आणि समस्यांबाबत गंभीर नसल्याची बाब या प्रकारातून उघड झाली.
देशांतील संपूर्ण वीज उद्योगाचे खाजगीकरण करण्याच्या हेतूने केन्द्र शासनाने एकतर्फी निर्णयाने आणलेले विद्युत (संशोधन) बील २०२१, महाराष्ट्राच्या जलविद्युत केन्द्राचे खाजगीकरण, स्वतंत्र कृषी कंपनी निर्माण करण्याचा निर्णय, तिन्ही कंपनीमध्ये तयार करण्यात आलेले एकतर्फी बदली धोरण, ३० हजार कंत्राटी कामगारांना वयाच्या ६० वर्षापर्यंत नोकरीचे संरक्षण रिक्त जागावर भरती, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचा वाढता हस्तक्षेप आदी धोरणात्मक प्रश्नावर पुकारलेला संप ऐन तोंडावर येऊन ठेपलेला असताना ऑनलाईन बैठकीतून काही साध्य होणार नाही याची कल्पना असूनही वाटाघाटीस नकार नको म्हणून संघटनांनी भागीदारी केली. परंतु या बैठकीत ठोस निर्णय बन झाल्याने अखेर संप अटळ ठरला.
वीज कामगारांचा होणारा संप हा केंद्र व राज्य सरकारच्या वीज उद्योगांचे खाजगीकरण करण्याच्या प्रस्तावित धोरणाच्या विरोधात असल्यामुळे वीज ग्राहक व सामान्य जनता यांनी या संपाला सहकार्य करावे असे, आवाहन कर्मचारी संघटनाच्या वतीने करण्यात आले आहे. कर्मचा-यांच्या मागण्या मंत्र्यांना कळविण्याचे आश्वासन उर्जासचिवांनी या बैठकीत दिले. या बैठकीत कोणताही प्रश्न न सुटल्याने व करार न झाल्याने सर्व संघटना प्रतिनिधींनी दि.२८ व २९ मार्चला दोन दिवसाच्या संपावर जाण्याचा निर्णय घोषीत केला. उर्जा उद्योगाच्या व कंपन्यांच्या अस्तित्वा करीता हा संप असल्याचे महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी अभियंते व कंत्राटी कामगार संघर्ष समितीने जााहीर केले आहे.