इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी रविवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मातोश्री या निवासस्थानी गेले. यावेळी त्यांनी शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन केले. मातोश्रीवर पोहोचल्यावर त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. यावेळी त्यांनी बाळासाहेब बसायचे त्या विशेष खुर्चीला वंदन करत आपल्या भावना व्यक्त केल्या. या भेटीनंतर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकत म्हटले की, माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्याचे म्हटले आहे. शिवसेना पक्षप्रमुख म्हटल्यामुळे त्याकडेही सर्वांचे लक्ष वेधले. आता या भेटीची माहिती सामनामध्ये देण्यात आली. २० मिनिटांच्या भेटीत नेमकं काय घडलं याबाबत ही माहिती देण्यात आली आहे.
काल राज ठाकरे यांनी अचानक मातोश्रीवर जायचे ठरवले. त्यानंतर राज ठाकरे यांनी बाळा नांदगावकर यांच्या फोनवरुन संजय राऊत यांना कॅाल लावला. मी उध्दव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभच्छा देण्यासाठी मातोश्रीवर येत आहे. असे सांगितले. संजय राऊत यांनी ही गोष्ट लगेचच उध्दव ठाकरे यांना सांगितली. त्यानंतर राज ठाकरे दादर परिसरातील आपल्या शिवतीर्थ या निवास दादर परिसरातील आपल्या शिवतीर्थ निवास्थानावरुन बाहेर पडले अवघ्या काही मिनिटांत ते मातोश्रीवर पोहोचले.
मातोश्रीवर राज ठाकरे यांनी गुलाबांचा बुके देऊन उध्दव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर दोघांचीही गळाभेट झाली. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत जाऊन त्यांच्या आसनासमोर दोघेही नतमस्तक झाले. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. शिवसेनाप्रमुखांच्या व्यंगचित्रांवरही चर्चा झाली. जवळपास २० मिनिटे राज ठाकरे मातोश्री निवासस्थानी होते. यावेळी दोन्ही बंधूमध्ये दिलखुलास गप्पा रंगल्या. नंतर निघतानाही उध्दव ठाकरे राज ठाकरे यांना सोडायला बाहरे आले. सगळ्यांना हात उंचावून नमस्कार करत राज ठाकरे परतले.
काही दिवसांपूर्वी ठाकरे बंधू मराठी मुद्द्यावर एकत्र आले. त्यानंतर हे दोन्ही बंधू काल एकत्र आले. या भेटीमुळे आता दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहे. या दोन्ही पक्षांनी युती होणार हे अधिकृतपणे जाहीर केलेले नसले तरी कालची ही भेट युतीच्या दिशेचे पुढचे पाऊल असल्याचे बोलले जात आहे.