मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मला आमदारकीचा मोह नाही पण नांदगावमध्ये असलेले दूषित वातावरण बदलण्यासाठी पुढाकार घेणारच असे ठामपणे सांगत, नांदगाव-मनमाड विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अपक्ष लढविणार असल्याची माहिती माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिली.
मनमाड येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, १९८५ पासून भुजबळ साहेब राजकारणात आहेत, अनेक वर्ष मंत्री आहेत. नांदगाव मध्ये पंकज भाऊ आमदार होते. मी देखील नाशिकचा खासदार होतो. या माध्यमातून नाशिकमध्ये एअरपोर्ट असेल, उड्डाणपूल, रिंग रोडचे काम असेल पाण्याचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न हाती घेऊन मी सोडविले आहेत. अनेक विकासकामे माझ्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात वेळोवेळी झालेली आहेत. नाशिक येथे नुकतेच आशिया अखंडातील सर्वात भव्य दिव्य असे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे पुतळे आपण बसविले आहेत. त्यामुळे सत्ता किंवा आमदारकी यापैकी कोणत्याही गोष्टींचा मोह मला नाही पण येथील नागरिकांची मागणी आणि दुषित आणि भयभीत असलेले वातावरण बदलण्यासाठी मी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, मी महायुतीकडे म्हणजेच आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडे उमेदवारी मागितली होती. नांदगावच्या लोकांनी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांनी अजितदादा पवार यांच्याकडे जाऊन नांदगाव तालुक्यातील वस्तुस्थिती मांडली होती. सध्याच्या विद्यमान आमदारांनी अन्यायाची भूमिका घेतली आहे. फक्त आमच्याच बाबतीत नाही तर सर्वच पक्षाच्या बाबतीत विद्यमान आमदारांनी अन्याय आणि दबावतंत्र वापरले आहे. खोट्या तक्रारी देणे, लोकांना धमक्या देणे, विकासकामे होऊ न देणे असे उद्योग या मतदारसंघात सुरू आहेत. त्यामुळे या भागातील लोकांचा उद्रेक झाला आणि त्यांनी मला विनंती केली की मी या भागात उमेदवारी करावी म्हणून मी या ठीकाणी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे.
महायुती आहे आणि आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजीतदादा पवार आणि पक्षातील नेत्यांना कुठेही अडचण नको म्हणून मी माझा राजीनामा पक्षाला पाठवला असल्याची माहिती समीर भुजबळ यांनी यावेळी दिली. व नांदगाव तालुका दहशत व भयमुक्त करायचा असेल तर आपण सर्व मतदारांनी, कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी मला साथ देणे गरजेचे आहे असे आवाहन देखील केले.