नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नांदगाव विधानसभा मतदार संघामध्ये माजी खासदार समीर भुजबळ हे उमेदवारी करणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समीर भुजबळ यांचा मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा मागितल्याची माहिती समोर आली आहे. समीर भुजबळ हे महाविकास आघाडीच्या संपर्कात असून ते शिवसेना ठाकरे किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.
नांदगाव विधानसभा मतदार संघातील माजी आमदार पंकज भुजबळ यांना विधान परिषदेत संधी मिळाल्यानंतर आता या मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांचा मार्ग मोकळा झाला असे बोलले जात होते. पण, त्यानंतर आता भुजबळ समर्थकांनी समीर भुजबळ हे नांदगावमध्ये लढणार असल्याचे सांगितले. त्यानंतर भुजबळ समर्थकांनी काल अजित पवार यांची भेट घेत आमदार कांदे यांच्या उमेदवारीला विरोध केला. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
नांदगाव मतदार संघात महायुतीमध्ये ही जागा शिवसेना शिंदे गटाला गेली असल्यामुळे आता समीर भुजबळ ही निवडणूक कोणत्या पक्षाकडून लढवतात ही उत्सुकता आहे. ते शरद पवार गट किंवा शिवसेना ठाकरे गटाकडून रिंगणात उतरतात की अपक्ष उमेदवार म्हणून या निवडणुकीत सामोरे जातात हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.
या मतदार संघात पंकज भुजबळ हे दोन वेळेस निवडून आले. पण, २०२९ च्या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला. त्यानंतर या मतदार संघात भुजबळ कुटुंबिय सक्रियच होते. या मतदार संघाच्या सिमेला लागूनच येवला विधानसभा मतदार संघ आहे. या ठिकाणी छगन भुजबळ हे आमदार आहे. ते महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. त्यामुळे समीर भुजबळ हे काय निर्णय घेतात हे अद्याप समोर आलेले नाही.