नांदगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नांदगाव विधानसभा मतदार संघात माजी आमदार पंकज भुजबळ की माजी खासदार समीर भुजबळ निवडणूक लढवणार याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न होता. पण, आता मंत्री छगन भुजबळांनी समीर भुजबळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांना समीर, नाशिक जिल्ह्यासह नांदगाव – मनमाड मतदारसंघाला आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी तुला उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो, याच मनापासून सदिच्छा! असे म्हटल्यामुळे त्यांची उमेदवारी निश्चित असल्याचे बोलले जात आहे.
नांदगाव विधानसभा मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे हे महायुतीकडून लढवणार हे निश्चित आहे. पण, त्यामुळे समीर भुजबळ हे कोणत्या पक्षांकडून निवडणूक लढवतात की अपक्ष म्हणून मैदानात उतरतात हे पुढील काही दिवसात स्पष्ट होणार आहे. या विधानसभा मतदार संघात गेल्या काही दिवसांपासून समीर भुजबळ सक्रिय झाले असून त्यांनी जिल्हा परिषदेच्या गटनिहाय विविध कार्यक्रम घेतले आहे. तर आज त्यांनी अजय- अतुल यांचा नवरात्रोत्सवानिमित्त मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे. या मतदार संघात शिवसेना ठाकरे गटातर्फे माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक यांचे नाव चर्चेत असून त्यांची उमेदवारी निश्चित समजली जाते. त्यामुळे समीर भुजबळ या मतदार संघातून निवडणूक कशी लढवता याबाबत त्यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही.
नांदगावपासून जवळ असलेल्या येवला विधानसभा मतदार संघातून महायुतीकडून मंत्री छगन भुजबळ यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे. त्यामुळे नांदगावमध्ये समीर भुजबळ काय निर्णय घेतात हा प्रश्न सध्या चांगलाच चर्चेत आहे. नांदगाव विधानसभा मतदार संघात पंकज भुजबळ यांनी दोनदा निवडणूक जिंकलेली आहे. गेल्या वेळेस त्यांचा पराभव झाला. त्यामुळे भुजबळांनी या मतदार संघातील आपला दावा कायम ठेवत. समीर भुजबळांना रिंगणात उतरवल्याचे बोलले जात आहे.
अशा दिल्या मंत्री छगन भुजबळांनी शुभेच्छा….
नाशिक जिल्ह्याच्या विकासकार्यात मला खंबीरपणे साथ देणारे माजी खासदार व मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष समीर भुजबळ यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!! राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेपासूनच पक्षात आणि नाशिकच्या राजकारणात माझ्या बरोबरीने काम करतानाच कुटुंबातील जबाबदाऱ्याही ते सक्षमपणे सांभाळत आले आहेत. त्यांची अभ्यासू व मेहनती वृत्ती, नाविन्याचा ध्यास आणि दूरदृष्टी या गुणांमुळे एक उत्तम लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आजवर कामाचा ठसा उमटविला आहे. आगामी काळातही ते अशाच पद्धतीने ताकदीने काम करत जनतेने दिलेली जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडतील, असा विश्वास आहे. समीर, नाशिक जिल्ह्यासह नांदगाव – मनमाड मतदारसंघाला आणखी पुढे घेऊन जाण्यासाठी तुला उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य लाभो, याच मनापासून सदिच्छा!