छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर व जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झालेली दिसून येते. तसेच तोडफोड हाणामारी असे प्रकार देखील खूपच वाढले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच एका टोळक्याने पर्यटन स्थळ बघण्यासाठी आलेल्या मुलीची छेडछाड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या तरुणीचे कपडे ओढण्याचा प्रयत्नही या टोळक्याने केला. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एक मुलगी आपल्या एका मित्रासोबतल बेगमपुरा भागात असलेले बिबी-का-मकबरा हे पर्यटन स्थळ पाहण्यासाठी आली होती. मात्र एका विशिष्ट समाजाची मुलगी इतर समाजाच्या मुलासोबत फिरत असल्याचे म्हणत, एक टोळके तिथे जमा झाले. मात्र यावेळी त्यांना पाहून त्या मुलाने मुलीला एकटे सोडून पळ काढला. मात्र त्या मुलीला या टोळक्याने घेरून शिवीगाळ सुरू केली, इतकेच नव्हे तर कोणी तिचा स्कार्फ ओढत होता, तर कोणी तिचा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत होता.
आजूबाजूला फारसे कोणीच नसल्याने मुलगी जोरजोरात ओरडत होती. मात्र तिला वाचवायला कोणी आले नाही, मला सोडा अशी विनवणी करत होती. पण जातीचे खूळ डोक्यात घुसलेल्या या टोळक्याला कसलाही विचार नव्हता. दरम्यान, या सर्व घटनेनंतर मुलीने आणि तिच्या घरच्या लोकांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली नाही. पण घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वतः पोलिसांकडून फिर्यादी होऊन गुन्हा दाखल करण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी व्हिडीओमधील टोळक्याची ओळख पटवली आहे. आतापर्यंत तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच पुढील तपास बेगमपुरा पोलिसांकडून करण्यात येत आहे.
Sambhajinagar Young Girl Molestation Crime Youths