छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांमध्ये छत्रपती संभाजीनगर परिसरात महिलांवरील अत्याचारामध्ये वाढ झालेली दिसून येते, विशेषतः अल्पवयीन मुलीव तरूणी यांची छेडछाड, विनयभंग, बलात्कार यासारख्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढलेले दिसून येते. छत्रपती संभाजीनगर शहरात नात्याला काळीमा फासणारी घटना उघड झाली आहे. वाळूज परिसरात वास्तव्यास असलेल्या अल्पवयीन मेहूणीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या मेहुण्याविरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणखी वाईट गोष्ट म्हणजे या आरोपीने आधी आपल्या सासूची आणि आजे सासूची देखील छेड काढली होती. त्यामुळे अखेर त्याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करीत होता अश्लील चाळे…
वाळूज महानगरात एक पिडीत अल्पवयीन तरूणी आपल्या कुटुंबासह वास्तव्यास असून, तिच्या मोठया बहीणचे लग्न झाले आहे. लग्नानंतर तिचा मेहुणा हा सासुरवाडीला म्हणजे वाळूज महानगरात अधून-मधून येत होता. पिडीत मुलीचे आई-वडील कामासाठी घराबाहेर गेले होते. दरम्यान यावेळी पिडीतेचे आजी, भाऊ व दोन बहिणी घरात होत्या. दरम्यान, सकाळी आरोपी मेहुणा हा सासुरवाडीत आला होता. आजुबाजुला कोणी नाही असे पाहून त्याने अल्पवयीन मेहूणीला बोलावून पिण्यासाठी पाणी मागितले.
तिने मेहुण्याला पाणी पिण्यासाठी दिले असता त्याने तिचा हात ओढून जवळ घेतले. यानंतर तिच्यासोबत अश्लील चाळे सुरू केल्याने तिने विरोध केला. मात्र या विरोधाला न जुमानता तो अश्लील चाळे करतच होता, पण यावेळी मुलीच्या आजीने आवाज दिल्याने घाबरलेल्या आरोपीने मेहूणीचा हात सोडून दिला. यानंतर सायंकाळी तो आपल्या पत्नीला घेऊन सासुरवाडीतून निघून गेला. मात्र या सर्व घटनेने पीडिता प्रचंड घाबरून गेली होती. त्यामुळे आई घरी येताच तिने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला.
जावया विरुद्ध तक्रार…
विशेष म्हणजे, आरोपीने यापूर्वीही देखील आपल्या सासूची व पीडिताची आजीची छेड काढली होती. मात्र, बदनामी होण्याच्या भीतीने त्यांनी या कृत्याची कुठेही वाच्यता केली नव्हती. मात्र मुलीच्या छेडछाडीच्या घटनेनंतर वाळूज पोलिस ठाणे गाठून पीडिताच्या आईने जावईच्या विरुद्ध तक्रार दिली आहे. या प्रकरणी वाळूज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाळूज भागात स्वतःच्या साली, सासू आणि आजी सासूची छेड काढल्याचं घटनेने अनेकांना धक्का बसला आहे. सासूरवाडीत गेल्यावर तेथील महिलांवर या आरोपीची वाईट नजर असायची. दरम्यान हा प्रकार अधिकच वाढल्याने अखेर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपीस कडक शिक्षा करावी अशी मागणी होत आहे.
Sambhajinagar Valuj Crime Women Molestation