छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या महाविकास आघाडीच्या (मविआ) वज्रमुठ सभेला छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी विविध अटींसह सशर्त परवानगी दिली आहे. रविवार, २ एप्रिल रोजी होणाऱ्या या सभेत विरोधकांकडून भाजपवर टीकेची तोफ डागणार असल्याने ही सभा स्फोटक होण्याचे संकेत मिळताहेत.
सध्या रमजानचा महिना सुरू आहे. तसेच नुकतीच रामनवमी झाली. या दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरातील किराडपुरा भागात दंगल घडली. त्यामुळे तणावाचे वातावरण आहे. दोन्ही समाजातील बांधवांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांनी काही जणांना दंगलप्रकरणी अटक केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर होणारी मविआची वज्रमुठ सभा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या सभेमुळे कायादा आणि सुव्यवस्था बिघडू नये, या उद्देषाने शहर पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला आहे.
https://twitter.com/NCPArunLad/status/1641620648123564032?s=20
या आहेत अटी
सभेला परवानगी देताना काही अटींचे पालन करणे अनिवार्य केले आहे. त्यामध्ये, सभेसाठी आवश्यक असलेल्या शासकीय विभागाच्या परवानग्या घेण्यात याव्यात, उभारण्यात आलेल्या स्टेजचे संबधित ठेकेदाराकडून तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्टेज स्टॅबिलीटी प्रमाणपत्र पोलिसात सादर करावे, जाहीर सभा संध्याकाळी ५ ते रात्री ९.४५ वेळेतच घ्यावी, तसेच कार्यक्रमाचे ठिकाण व वेळेत कोणत्याही प्रकारचा बदल करू नये या प्रमुख अटींचा समावेश आहे.
शस्त्र बाळगणे, रॅली काढण्यास मज्जाव
कार्यक्रमाच्यावेळी कोणत्याही प्रकारे कोणताही रस्ता रहदारीस बंद करण्यात येऊ नये अथवा वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी, सभेला येताना व परत जाताना कोणीही आक्षेपार्ह घोषणाबाजी, हुल्लडबाजी, असभ्य वर्तन करू नये, सभेसाठी येताना अथवा परत जाताना कोणत्याही प्रकारे मोटारसायकल, कार रॅली काढू नये. कार्यक्रमादरम्यान कोणतेही शस्त्र, तलवारी, इत्यादी बाळगू नये किंवा प्रदर्शन करू नये, असेदेखील बंधन पोलिसांनी टाकले आहे.
https://twitter.com/satishchavan55/status/1641682514401185795?s=20
Sambhajinagar MVA Vajramuth Sabha Permission Politics