छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील पंतप्रधान आवास योजनेतील गैरव्यवहार आता ईडीच्या रडारवर आहे. ४ हजार कोटींच्या प्रकल्पातील या घोटाळ्यात आता लवकरच अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या योजनेशी संबंधित कागदपत्रे ईडीने ताब्यात घेतली आहेत. याच प्रकरणात महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांना ईडीने नोटीस बजावली आहे. दरम्यान, अशी कोणतीही नोटीस मला मिळाली नसल्याचे पाण्डेय यांनी स्पष्ट केले आहे.
औरंगाबाद महानगरपालिकेच्या अख्त्यारित ही योजना सुरू आहे. जवळपास ४० हजार घरांचा ४ हजार कोटींचा हा प्रकल्प आहे. पंतप्रधान आवास योजनेच्या टेंडरमध्ये घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. समरथ मल्टीविज इंडिया, सिद्धार्थ प्रॉपर्टीज, नवनिर्माण कन्स्ट्रक्शन्स यांच्यासह चार कंपन्यांनी निविदा दाखल केली होती.
जिल्हा प्रशासनाकडून पडेगाव, तीसगाव, हरसूल, सुंदरवाडी आणि चिकलठाणा येथील १२८ हेक्टर जमीन प्रकल्पासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. गेल्यावर्षी तत्कालीन मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी निविदा अंतिम करून केंद्र सरकारकडे प्रस्ताव मंजुरीसाठी दाखल केली होती. केंद्राने त्याला मान्यताही दिली. पण समरथ कंपनीने बँक गॅरंटी भरली नव्हती. बरीच कार्यवाही झाल्यानंतर चारपैकी एक कंपनी अपात्र ठरविण्यात आली होती.
उपायुक्तांनी केली तक्रार
महापालिका उपायुक्त अपर्णा थेटे यांनी घोटाळ्याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर तीन कंत्राटदार कंपन्यांसह १९ मालक-भागीदारांविरोधात सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एकाच लॅपटॉपवरून निविदा
एकाच लॅपटॉपवरून एकाच आयपी अॅड्रेसवरून निविदा दाखल करणाऱ्या कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यात आले आहे. या कंपनीने राज्यात सहा ते सात शहरांमध्ये पंतप्रधान आवास योजनेची कामे घेतली आहेत. कामे मिळविण्यासाठी पुण्यातील एका इमारतीचे प्रमाणपत्र जोडण्यात आले आहे. प्रशासक डॉ. अभिजित चौधरी यांनी चौकशीसाठी एका समितीची स्थापना केली होती.
Sambhajinagar Commissioner Astikkumar pandey ED Notice