छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गुढीपाडव्याच्या दिवशीच गंगापूर तालुक्यात एक दुर्देवी दुर्घटना घटना समोर आली असून, अंगावर उकळते पाणी पडून सात वर्षांच्या बालीकेचा मृत्यू झाला. घरातच उकळलेले पाणी अंगावर पडून ही चिमुकली जखमी झाली होती. त्यानंतर तिच्यावर छत्रपती संभाजीनगर मधील शासकीय घाटी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
प्रतिभा सुभाष खंडागळे (वय ७ वर्षे, पुरी, गंगापूर) असे मृत मुलीचे नाव आहे. प्रतिभा घरात झोपलेली होती. याचवेळी तिची आई शेगडीवर तापलेले गरम पाणी खाली घेत असतानाच, कडक पाणी तिच्या अंगावर पडल्याने प्रतिभा गंभीर जखमी झाली होती. त्यामुळे तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दरम्यान, जखमी प्रतिभावर उपचार करुन घरी पाठविण्यात आले होते. मात्र तिला पुन्हा त्रास सुरु झाल्याने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु रविवारी दुपारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी गंगापूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेबद्दल गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
स्कुटीवरील तरूणी ठार
छत्रपती संभाजीनगर शहरात वडिलांसोबत स्कूटीवरुन जाणाऱ्या तरुणीचा मनपाच्या टँकरखाली येऊन मृत्यू झाला आहे. शहरातील एका चौकात हा भीषण अपघात झाला. कॉलेजला जाण्यासाठी दीक्षा काळे (वय २३) आणि तिचे वडील मधुकर काळे हे स्कूटीने घरातून बाहेर पडले. मधुकर काळे हे स्कूटी चालवत होते. याचवेळी एका चौकात येताच टँकरचालकाने अचानक वळण घेतले. मात्र काळे यांची दुचाकी टँकरच्या जवळ असल्याने त्यांची दुचाकी टँकरच्या मागील बाजूला धडकली. त्यानंतर पाठीमागे बसलेली दीक्षा दुचाकीवरुन उडून खाली पडली, त्यातच तिचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी अपघातग्रस्त टँकर जप्त केला. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आली आहे.
Sambhajinagar 7 Year Old Girl Accident Young Girl Death