छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात अनेक मंदिरे असून या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम सुरू असतात. सध्या अधिक मास असल्याने धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होत आहेत. परंतु त्यातच एका मंदिरात एक दुर्दैवी घटना घडली. पूजेसाठी बेलाचे पाने तोडताना भिंत अंगावर पडून एका पुजाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवार, दि. १८ जुलै हर्सूल परिसरात हर्सूल टी पॉईन्ट- जळगाव रोडवरील गजानन महाराज मंदिरात ही घटना घडली. हे पुजारी बाबा परिसरात सर्वांच्या परिचयाचे आणि ओळखीचे असल्यामुळे या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
पुजेची तयारी करतानाच
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मूळ कन्नड तालुक्यातील माळीवाडा येथील रहिवासी असलेले बबन गुरव ( वय ५० ) हे हर्सूल पोलीस ठाण्याच्या गेल्या अनेक वर्षांपासून बबन बाबा या मंदिरात पुजारी म्हणून काम करत असतानाच तेथेच निवासाला होते. दररोज सकाळी उठून ते आधी पूजेचे साहित्य गोळा करत असत, मंदिरातील पूजेसाठी ते बेलाचे पाने तोडण्यासाठी मंदिरासमोर भिंतीलगत असलेल्या असलेल्या बेलाच्या झाडावर चढले. त्यांचा एक पाय झाडावर तर दुसरा पाय भिंतीवर होता. यावेळी भिंत पडत असल्याचे समजताच त्यांनी उडी मारली.
मोठा आवाज झाला
बबन बाबा पुजारी हे नेहमीच या झाडावर चढत असत, सोमवार, सणवार, महाशिवरात्र आणि श्रावण महिन्यात बेलाची पाने घेण्यासाठी ते झाडाच्या फांदीवर चढून बसत, परंतु पावसामुळे झाडालगतची भिंत कमकुवत झाली होती. पुजारी झाडावर चढल्यावर त्यांच्या लक्षात आले की, भिंत कोसळत आहे, त्यामुळे ते घाबरले आणि त्यांनी खाली उडी मारली. दुर्दैवाने भिंत बबन यांच्या अंगावर पडली. यात ते गंभीर जखमी झाले. दरम्यान भिंत पडल्याचा मोठा आवाज आल्याने परिसरात आवाज झाल्याने आजूबाजूचे नागरिक धावत आले. त्यांनी तात्काळ बबन पुजारी यांना शासकीय (घाटी ) रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.