छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंधरा वर्षे विनावेतन नोकरी केल्यानंतर दोनच दिवसांपूर्वी त्या शिक्षकाच्या हाती पहिलं वेतन आलं. त्याचा आनंद गगनात मावेनासा होता. पण काळाला काही औरच मंजूर होते. एका विचित्र अपघातात काळाने शिक्षक आणि त्याच्या मुलाला हिरावून घेतले.
छत्रपती संभाजीनगर येथील नक्षत्रवाडीमध्ये हा अपघात घडला. वडगोद्री येथील विवेकानंद शिक्षण संस्थेच्या श्री गुरुदेव विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयात संजय दहिफळे हे २००८ पासून शिक्षक होते. मात्र त्यांना पगार सुरू झाला नव्हता. पुढे २०१८ मध्ये त्यांना अनुदानासाठी मान्यता मिळाली. मात्र प्रत्यक्षात पगार हाती आला नव्हता. पण मार्च महिन्याच्या पहिलाच पगार दोन दिवसांपूर्वी त्यांच्या बँक खात्यात जमा झाला होता.
विशेष म्हणजे एवढ्या वर्षांनी मिळालेला पगार त्यांनी बँकेतून काढलाही नव्हता, पण त्यापूर्वीच त्यांचा अपघाती मृत्यू झाला. संजय, त्यांचा मुलगा समर्थ आणि पत्नी वर्षा दुचाकीवरून पैठणकडे निघाले होते. मात्र नक्षत्रवाडीजवळ पैठणकडून एक खडीचा हायवा येत होता आणि दुसऱ्या बाजूने पैठणकडे एक बलेनो कार जात होती. यावेळी हायवाने बलेनो कारला जोराची धडक दिली. या धडकेत संबंधित कार रस्त्याच्या कडेला जाऊन थांबली. मात्र याचवेळी अपघातग्रस्त हायवाने संजय यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.
हायवाने संजय यांच्या गाडीला धडक दिल्यावर त्यांची दुचाकी ट्रकच्या चाकाखाली आली. या हायवाचा एवढा वेग होता की, संजय यांच्या दुचाकीला धडक दिल्यानंतर अपघातग्रस्त हायवा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुसऱ्या हायवावर जाऊन आदळला. या भीषण अपघातात संजय आणि त्यांचा मुलगा समर्थ दहिफळेचा जागीच मृत्यू झाला. तर संजय यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत.
मुलीसाठी शहरात
संजय दहिफळे यांच्या मुलीने अलीकडेच दहावीची परीक्षा दिली होती. त्यामुळे नीटच्या तयारीसाठी तिने शहरातील एका खाजगी क्लासमध्ये प्रवेश घेतला होता. दरम्यान संजय यांच्या पत्नी वर्षा यांचं माहेर बीड बायपासला असल्यामुळे त्या आपल्या मुलांसह आधीच शहरात आल्या होत्या. मुलीला भेटल्यानंतर संजय, त्यांची पत्नी आणि मुलगा पैठणच्या दिशेने निघाले होते.
Sambhaji Nagar Road Accident Teacher and Son Killed