छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची निदर्शनास आले आहे. विशेषतः अल्पवयीन मुली, तरुणी, महिला यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार आणि बलात्काराच्या घटना गेल्या सहा महिन्यात वाढल्या असून पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. अशा गुन्हेगारांना जबर शिक्षा केली तर अशा प्रकारचे गुन्हे करण्यास कोणीही तयार होणार नाही, अशी भावना जनमानसातून उमटत आहे. एका शाळेतील बालिकेवर लैंगिक अत्याचाराची घटना घडल्याने मोठी आहे खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात व्यक्तीचा शोध सुरू असून त्याला शाळेतीलच एका शिक्षिकेने मदत केल्याचाही आरोप करण्यात येत आहे.
बालवर्गातील प्रकार
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गारखेडा पुंडलिकनगर भागातील एका शाळेत बालवर्ग भरतात, या ठिकाणी पालक आपल्या छोट्या मुलांना शाळेत नेऊन सोडतात, परंतु ही मुले खरेच सुरक्षित आहे का? असा प्रश्न आता विचारला जात आहे, कारण या शाळेत बाल वर्गातील छोट्या गटात शिकणाऱ्या एका साडेतीन वर्षाच्या मुलीवर एका अमोल नावाच्या व्यक्तीने लैंगिक अत्याचार केला आणि आणखी वाईट घटना म्हणजे शिक्षिकेने त्याला मदत केल्याची तक्रार दाखल करण्यात आली. यावरून पोलिस ठाण्यात अत्याचार, पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी शिक्षिकेला पोलिसांनी ताब्यात घेतले तर त्या संशयिताचा तपास सुरु केला आहे.
वर्गात ठेवते कोंडून
बालिकेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, शहरातील एका शाळेत ज्युनिअर केजी म्हणजेच छोट्या गटात त्यांची ३ वर्ष ८ महिने वयाची मुलगी मागील महिन्यापासून शिकते. काही दिवस ती शाळेत खुश होऊन जात होती, तसेच येतानाही आनंद व्यक्त करीत असे, परंतु काही दिवसापासून तिला काहीतरी त्रास होत असल्याने ती रडत होती परंतु नेमका काय त्रास होतात आईला समजू शकले नाही, त्यामुळे त्या महिलेने आपल्या चिमुरडीला डॉक्टरांकडे नेण्याचे ठरविले, तिला एका रुग्णालयात दाखविले. तेव्हा त्या मुलीच्या आईला मोठा धक्का बसला. कारण बालिकेच्या गुप्तांगाजवळ जखम असल्याचे आढळून आले.
पेन्सिलने जखम
डॉक्टरांनी आणि आईने विचारले असता त्या बालिकेने रडत रडत सांगितले की, एका अमोल नावाचा व्यक्ती तिच्या गुप्तांगामध्ये पेन्सिल फिरवतो तसेच वर्गशिक्षिका तिला मारहाण करते आणि अमोलसोबत एका रूममध्ये कोंडून ठेवते. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून शिक्षिका आणि अमोलविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र दुसरीकडे पोलिसांनी या शिक्षिकेची चौकशी केली, तेव्हा, या शाळेत सर्व महिला शिक्षिका असून कोणीही पुरुष नाही तसेच आम्ही मुलांना मारहाण करत नसल्याचे सांगितले.