कन्नड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनुष्याप्रमाणे प्राण्यांना समज किंवा बुध्दी नसते त्यामुळे त्यांनी काही चुक केली तर त्याची शिक्षा त्यांच्या मालकाला होते. मात्र किरकोळ चुक असेल तर माफ करायला हवे, कारण प्राण्यांबद्दल भुतदया दाखवायला हवी, परंतु छत्रपती संभाजीनगर जिल्हयात अजब आणि धक्कादायक प्रकार घडला. ३ हजाराच्या बकरीने पाला खाल्ला म्हणून तिला दिवसभर बांधून ठेवले, इतकेच नव्हे तर बकरीच्या मालकावर गुन्हा दाखल करीत २ हजाराचा दंड ठोठावण्यात आला. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील पिशोर येथे हा गैरप्रकार घडला, विशेष म्हणजे पोलीसांनीच हे कृत्य केले. आधीच संभाजीनगरात चार कुत्र्यांनी माजी महापौरांचा १५ हजाराचा बूट चोरल्याने एकच खळबळ उडाली असतानाही दुसरी वेगळीच घटना समोर आली आहे.
पोलीस ठाण्याच्या आवारातच
पिशोर पोलीस ठाण्याच्या आवारातील झाडांचा पाला खाल्ल्यामुळे पोलिसांनी बकरीचे मालक राउफ रज्जाक सय्यद यांच्यावर गुन्हा दाखल करत दंड ठोठावला आहे. तसेच दिवसभर बकरीला पोलीस ठाण्याच्या आवारात बांधून ठेवले. ३ हजाराची बकरी आणि २ हजाराचा दंड ठोठावल्यानंतर बकरी मालकावर डोक्याला हात लावण्याची वेळ आली आहे. पोलिसांच्या या विचित्र कारवाईवर नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. बकरी पिशोर पोलिसांवर टीका होत आहे. बकरी मालकानेही पिशोर पोलिसांवर आपला संताप व्यक्त केला असून या कारवाईची सोशल मीडियावर जोरात चर्चा सुरू आहे.
माजी महापौरांचा बुट…
माजी महापौर नंदकुमार घोडले यांच्या मातोश्री या निवासस्थानातून दोन दिवसांपूर्वी कुत्र्यांनी त्यांचा १५ हजार रुपये किंमतीचा बूट पळवला होता. चार कुत्र्यांनी हा रात्रीच्या वेळी खेळ केला. सदर घटनेचे संपूर्ण दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आले तो बुट शोधण्यासाठी आता संपूर्ण महापालिका कामाला लागली आहे, महापालिकेचे कर्मचारी दोन दिवस माजी महापौरांचा बूट शोधत होते. अखेरपर्यंत हा बूट सापडला नाही. मात्र, या चारपैकी एक कुत्रा सापडला. त्याला महापालिका घेऊन गेली असून त्या कुत्र्यावर नसबंदी करण्यात येणार आहे. सध्या शहरात कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून ते नागरिकांवर हल्ले करत आहेत. त्यामुळे सर्वत्र भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे आता महापालिका प्रशासनाने या कुत्र्यांचा प्रार्दुभाव रोखावा, अशी मागणी माजी महापौर घोडले यांनी केली आहे.