छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लहान मुलांना घरातच असो की बाहेर खूपच सांभाळावे लागते. अन्यथा दुर्घटना घडू शकते, छत्रपती संभाजीनगर शहरात अशीच एक भयानक घटना घडली, पडेगाव परिसरात बहिणींसोबत खेळत असताना गॅसवरील गरम पाणी अंगावर पडून भाजलेल्या दोन वर्षीय चिमुकलीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
खेळता खेळता
याबाबत अधिक माहिती अशी की, पडेगावात कासंबरी दर्गा परिसरात शेख कुटुंब राहते. हारुण शेख हे बाहेरून घरी येत होते, त्यामुळे त्यांच्या अंघोळीसाठी पत्नीने गॅसवर पाणी गरम करुन ठेवले. तर हारुण यांच्या पत्नी बाथरुममध्ये होत्या. गॅसवरच गरम पाणी होते. गॅसजवळच हारुण यांच्या तीन मुली खेळत होत्या. त्यापैकी सर्वात लहान मुलगी शिद्रा हारून शेख (वय २ वर्षे) हिच्या अंगावर हे गरम पाणी सांडले. उकळते पाणी अंगावर पडल्याने शिद्रा जोरजोरत रडू लागली. मुलीच्या ओरडण्याचा आवाज आल्याने आईने तत्काळ धाव घेतली. यात शिद्रा गंभीर भाजली होती. तिच्यावर घाटीत उपचार सुरु असताना उपचारादरम्यान मृत्यू झाला.
भांड्याला धक्का लागला
हारूण शेख हे सकाळी घरा बाहेर गेले होते. दुपारी १ वाजता घरी येण्यापूर्वी त्यांनी पत्नीला फोन केला. स्नानासाठी पाणी गरम करुन ठेवण्यास सांगितले. त्यामुळे शिद्राच्या आईने गॅसवर पाणी ठेवले. आई गॅस पासून थोडी बाजूला होत, बाथरूम मध्ये गेली. याच दरम्यान दोन मोठ्या बहिणींसोबत शिद्रा खेळता खेळता गॅसजवळ आली. त्याचवेळी शिद्राचा गरम पाण्याच्या भांड्याला धक्का लागला. त्यामुळे उकळते पाणी तिच्या अंगावर पडले. शिद्राचे किंचाळत रडणे ऐकून आईने धाव घेतली. त्यानंतर तिला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर गेल्या चार दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र चिमुकलीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या घटनेची नोंद पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. या घटनेने शेख कुटुंबाला मोठा धक्का बसला असून त्यांच्यावर दु : खाचा डोंगर कोसळला आहे.