संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये राज्य कामगार विमा आयुक्तालय यांच्याकडून कामगार रुग्णालय सुरू करण्यासंदर्भात निर्णय झाला असून, त्यामध्ये वाढीव दोनशे खाटांचे सुसज्ज रुग्णालय शहरात सुरू होणार आहे. या रुग्णालयामुळे शहरातील कामगारांच्या कुटुंबास चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळणार आहेत. रुग्णालयासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळने तातडीने जागा उपलब्ध करून द्यावी. राज्य शासनाकडे रुग्णालयाचा प्रस्ताव पाठवावा,अशा सूचना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी आज दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात कामगार रुग्णालयास जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात आज डॉ. कराड यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी आ. प्रशांत बंब , जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांण्डेय, महानगर पालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी चेतन गिरासे, राज्य कामगार विमा आयुक्तालयाचे राहुल चौधरी ,अश्विनी यादव, सामान्य प्रशासनाचे प्रभोदय मुळे, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मंडलेचां, अनिल पाटील ,स्मॉल इंडस्ट्रीजचे राहुल मोगले, पंकज गायकवाड आदी उपस्थित होते.
राज्य कामगार विमा आयुक्तालय यांच्याकडून तीस घाटाचे रुग्णालयाची मागणी मंजूर करण्यात आली असून, कामगार कल्याण मंत्रालयाने रुग्णालयास मान्यता दिली आहे. पण, शंभर खाटांचे वाढीव रुग्णालय सुरू करण्यासंदर्भात आपण कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांना विनंती केली आहे. त्या अनुषंगाने औद्योगिक विकास महामंडळ कडून वाळूज क्षेत्रातील जागा रुग्णालयास उपलब्ध करून देण्यासंदर्भात बैठकीत विचार करण्यात आला.
यावेळी डॉ भागवत कराड म्हणाले, वाढीव खाटांचे रुग्णालय प्रस्तावित करण्यासोबतच भविष्यात येथील औद्योगिक वसाहतीचा विस्तार विचारात घेता या ठिकाणी पाचशे खाटांचे रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय देखील उभे राहू शकते. त्यामुळे तातडीने रुग्णालयासाठी जागा देण्यासंदर्भात प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवावा आणि राज्याकडून तो केंद्राकडे येईल. त्यास तात्काळ मंजुरी देण्यासाठी प्रयत्न करणार शहरांमध्ये कामगारांसाठी सुसज्ज नवीन हॉस्पिटल उभे राहणार आहे. या माध्यमातून कामगार आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाना आरोग्य सुविधा मिळणार आहेत असल्याचेही डॉ. कराड म्हणाले.