छत्रपती संभाजीनगर/धुळे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या काही दिवसांपासून शहरात गुन्हेगारीची घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषतः अल्पवयीन मुली, तरुणी आणि महिलांच्या छेड काढणे, लैगिंक छ्ळ करणे, अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच आता शहरातील शाळेत शिक्षकाकडूनच अत्यंत निंदनीय प्रकार घडल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे धुळे शहरात एका बँकेत असाच एक गैरप्रकार घडला या प्रकरणात बँकेच्या मॅनेजरला महिलांनी चांगला चोप दिला आहे
मुख्याध्यापिकेची तक्रार
शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते हे अत्यंत पवित्र मानले जाते. परंतु शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना छत्रपती संभाजीनगर शहरात घडली आहे. येथील एका शाळेत शिकवणाऱ्या एका शिक्षकाने पाचवीच्या वर्गातील दोन मुलींसोबत अश्लील चाळे केल्याचा संताप जनक प्रकार उघडकीस आला. इतकेच नव्हे तर या शिक्षकाने वर्गातील एका मुलाला आवश्यकतेपेक्षा जास्त मारहाण केल्याचे देखील उघड झाले आहे. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी शिक्षकाविरुद्ध पोक्सो कायद्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बँकेच्या मॅनेजरला चोप
धुळे शहरातील पारोळा रोड येथे खासगी बँकेतील मॅनेजर महिला कर्मचारी यांच्यासोबत अश्लील चाळे करत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. याच तक्रारींवरून शिवसेना ठाकरे गटाच्या महिला शिवसैनिकांनी भर रस्त्यात त्याला चोप दिला. खासगी बँकेतील मैनेजर हा महिला कर्मचाऱ्यांना अश्लील चॅटिंग करत होता. इतकेच नाही तर त्या महिलासोबत अश्लील चाळे करत असल्याने बँकेतील महिला कर्मचाऱ्यांनी ठाकरे गट शिवसैनिकांशी संपर्क साधला होता. यानंतर ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बैंकेत जात संबंधित बँक अधिकाऱ्याला ओढून बाहेर आणले. यानंतर भर रस्त्यात चोपून पोलिसांच्या हवाली केले होते. अशाप्रकारे या अधिकाऱ्याला अद्दल घडवल्याबद्दल त्याची चांगली चर्चा सुरू आहे.