छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- राज्यातील गुन्हेगारी वाढत चालल्याचा अनेक घटना सातत्याने वाढत जाताना दिसत आहेत. अनेकदा सरकारी अधिकाऱ्यांना देखील याचा फटका बसताना दिसतो. नुकताच असाच एक प्रकार संभाजीनगरमध्ये घडताना दिसला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकातील महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर चक्क पेट्रोल टाकून तिला पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी दोघांना अटक केली असून दोघे फरार आहेत.
सोयगाव तालुक्यातील नांदगाव तांडा येथे हा प्रकार घडला आहे. या महिला कर्मचाऱ्याने ढाब्यावरील अवैध दारुविक्रीवर छापा मारला होता. या कारवाईचा राग आल्याने चौघांनी हे दुष्कृत्य करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वाहनावर पेट्रोल टाकून जाळून जाळण्याचा प्रयत्न केला आहे. अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला, मात्र या महिलेने स्वतःला कसेबसे वाचवले. बद्री महारु राठोड (३९), संदीप बद्री राठोड (२३), किरण बद्री राठोड (२१) आणि राहुल भाईदास राठोड (२२) अशी आरोपींची नावे आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागातील पथकाने बुधवारी एका ढाब्यावर छापा टाकला. यावेळी या पथकाने ७० ते ८० ली. ताडी आणि विनापरवाना देशी दारुचे खोके असा मुद्देमाल जप्त केला. यावेळी ढाबाचालक बद्री महारु राठोड यांच्या घरात झडती घेण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक गेले. कारवाईसाठी आलेल्या उत्पादन शुल्क विभागाच्या लाल दिव्याच्या शासकीय वाहनावर पेट्रोल टाकून चौघांनी पेटवले.
आरोपी महिला कर्मचाऱ्याच्या मागे
चारही आरोपींनी पोलिसांचे शासकीय वाहन पेटवून दिल्यावर, पथकाच्या दिशने मोर्चा वळवला. त्यानंतर पथकातील महिला पोलीस कर्मचारी शारेख कादरी यांच्या मागे राहुल भाईदास राठोड, किरण बद्री राठोड, संदीप राठोड हे तिघेही पेट्रोलची बाटली घेऊन धावत सुटले. कर्मचारी शारेख कादरी यांनी जीव मुठीत घेऊन स्वतःला वाचवले. या पथकाने गावातून सुटका करुन घेत सोयगाव पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी संदीप बद्री राठोड आणि राहुल भाईदास राठोड या दोघांना अटक केली. अन्य दोघे फरारच आहेत.