छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मराठवाड्याची राजधानी म्हणून छत्रपती संभाजीनगर शहराची ओळख आहे. या शहरात घडलेल्या प्रत्येक घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रातून मिळतात. सध्या महापालिका आयुक्त यांच्या जंगी वाढदिवसाची जोरदार चर्चा सुरू आहे. पूर्वीच्या काळी दुष्काळ पडला तरी काही राजांना त्याची चिंता नसे, ते त्यांच्याच भव्य सोहळ्यामध्ये मश्गुल असत. अशीच काहीशी परिस्थिती सध्या या शहरात दिसत आहे. एकीकडे शहरात दहा दहा दिवस पाणी येत नसल्याने नागरिक पाण्यासारख्या मूलभूत समस्यांसाठी तोंड देत आहेत, तर दुसरीकडे शहराचे संबंधित अधिकारी मात्र आपल्या स्वतःच्या वाढदिवसाच्या सोहळ्यात गुंग असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे याला महापालिकेतील सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचारी जबाबदार असल्याचे दिसून येत आहे.
गुलाबांच्या फुलांचा सडा आणि रेड कार्पेट
शहराच्या अनेक भागांमध्ये दहा-दहा दिवस पाणी येत नाही. या उलट शहराचे मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांचा वाढदिवस मात्र अतिशय थाटात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे यासाठी मनपा कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सुमारे अडीच लाखांची वर्गणी देखील काढल्याची देखील चर्चा आहे. स्मार्ट सिटी कार्यालयात रेड कार्पेट, त्यावर गुलाबाच्या फुलांचा सडा, शानदार फेटे, सुंदर रांगोळी, जेवणासाठी उत्तम पदार्थ आणि शुभेच्छा देण्यासाठी अधिकाऱ्यांच्या रांगा असे देखावा संभाजीनगरमध्ये रंगला होता. वास्तविक पाहता छत्रपती संभाजीनगरमध्ये सध्या महापालिकेमध्ये लोकनियुक्त प्रतिनिधी तथा नगरसेवक नसल्याने प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांवरच सर्व शहराची जबाबदारी असल्याने त्यांनी जबाबदारीचे भान ठेवून नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे लक्ष देणे अपेक्षित आहे, यावर ते आपल्याच वाढदिवसाचा सोहळ्यामध्ये दंग असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
कर्मचाऱ्यांनी जमा केले २.४३ लाख
स्मार्ट सिटी कार्यालयात वाढदिवसाचे नियोजन करण्यासाठी अधिकारी अतिशय तत्पर होते, परंतु हीच तत्परता जर शहराच्या समस्या सोडवण्यात दाखवली, तर काही महिन्यांत संभाजीनगर शहराचा चेहरामोहराच बदलून जाईल, अशी भावना अनेक नागरिक व्यक्त करता आहेत. या उलट शहराचे सध्या प्रमुख असलेल्या मनपा आयुक्त जी श्रीकांत यांचा वाढदिवस थाटामाटात साजरा करण्यासाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. महापालिका आणि स्मार्ट सिटीमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून २ लाख ४३ हजारांची वर्गणी जमा करून आयुक्तांचा हा शाही थाटात वाढदिवस साजरा केला, इतकेच नव्हे तर आयुक्तांसाठी विशेष केकची आणण्यात आला होता. त्याचप्रमाणे आयुक्त बसतात त्या कार्यालयात फुगे लावण्यात आले, टेबलावर बुके ठेवून कार्यालय सजवण्यात आले. त्यामुळे मनपा आयुक्त यांच्या वाढदिवसाची शहरात दिवसभर चर्चा होती. आता या प्रकाराची राज्य शासनाने गंभीर दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.