संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील लाचखोर सहाय्यक नगर रचनाकार पवन परिहार याने दीड लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) त्याच्यावर कारवाई केली आहे. याप्रकरणी सिडको पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात राज्यभरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वेगवेगळ्या कारवाया करुन लाचखोरांना रंगेहात पकडले आहे. तर काही जणांनी लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. नाशिकमध्ये तहसिलदारांचे लाचखोरीचे प्रकरण गाजत असतांना सहाय्यक नगर रचनाकार लाच मागितल्याच्या प्रकरणात सापडला आहे.
या लाच प्रकरणी परिहार याने एका कन्स्ट्रक्शन कंपनीच्या चिकलठाणा परिसरातील गट क्र. ३७७ मधील १७ हजार १०० स्क्वेअर मीटर जागेचे विकास करारनाम्याचे शासकीय मूल्यांकन निश्चित करण्यासाठी तीन लाख रुपये लाच मागितली त्यानंतर तडजोडीअंती त्याने दीड लाख रुपये मागितले. यानंतर कंपनीने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संदीप आटोळे यांच्याकडे तक्रार केली. पथकाने याची खात्री केली असता त्याने तीन वेळा पैसे मागितल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
या लाच प्रकरणात तक्रारदारावर परिहारला संशय आल्याने त्याने पैसे स्वीकारणे टाळले. तसेच आठ दिवसांपूर्वी त्याला कारवाईची शक्यता जाणवताच मेडिकल रजा टाकून पसार झाला. त्यामुळे लाच मागिल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीपथकाकडून त्याच्या घराची झाडाझडती घेतल्याचेही बोलले जात आ्रहे.
sambhaji nagar acb raid trap bribe corruption
town planning crime