मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अरबी समुद्रात बांधण्यात येणा-या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम ८ वर्षानंतरही सुरु झाले नसल्यामुळे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे छत्रपती संभाजीराजे यांनी आज मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे जाऊन शिवस्मारकर शोधण्याची मोहिम सुरु केली.
ते पुढे म्हणाले की, मुंबईच्या अरबी समुद्रात जगातील सर्वात उंच असे जागतिक दर्जाचे भव्य शिवस्मारक साकारू, अशी स्वप्ने शिवप्रेमी जनतेला दाखवत मागील तीन दशकांत राज्यात अनेक सरकारे आली आणि गेली. २४ डिसेंबर २०१६ रोजी भाजप – शिवसेना प्रणित महायुती सरकारने अत्यंत भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रात शिवस्मारकाचे जलपूजन केले. स्मारकाच्या कामांस सुरुवात झाल्याच्या अनेक बातम्या आल्या. शासनाच्या रेकॉर्डवर या स्मारकासाठी कोट्यवधी रुपये खर्च देखील झाले आहेत. येत्या काही दिवसांत या जलपूजन कार्यक्रमास आठ वर्षे पूर्ण होतील, मात्र अरबी समुद्रातील हे शिवस्मारक अद्यापही कुठे दिसत नाही. त्यामुळे चला, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलपूजन केलेले अरबी समुद्रातील शिवस्मारक शोधायला ही मोहिम सुरु केली आहे.