मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आपल्या वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेल्या संभाजी भिडे गुरुजी यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या विवादास्पद वक्तव्यांने संपूर्ण राज्यात खळबळ माजविली आहे. एकीकडे या वक्तव्याशी आणि भिडे गुरुजींशी संबंध नसल्याचे भाजप म्हणत आहे तर दुसरीकडे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी भिडेंवर कारवाई होणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, अद्याप यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिका मांडलेली नाही. या पार्श्वभूमीवर आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांनी भिडेंच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली आहे.
भिडे गुरुजी यांनी अमरावती येथे महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले. महात्मा गांधी यांचे वडील करमचंद गांधी नसून मुस्लिम असल्याचा दावा भिडेंनी केला आहे. त्यांच्या वक्तव्यावर सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. अशातच नाराज असलेल्या आमदार बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत त्यांनी या प्रकरणावर भूमिका स्पष्ट करावी, असे म्हटले आहे. तसेच असे वक्तव्य जर एखाद्या मुस्लिम व्यक्तीने केले असते तर काय, असादेखील सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे. आमदार कडू यांनी संभाजी भिडेंवरही टीकेची झोड उठविली आहे. ते म्हणाले,‘ एवा मोठ्या महापुरुषाबद्दल बोलताना प्रत्येकाने आपली औकात पाहिली पाहिजे. तुम्ही स्वातंत्र्यापूर्वी जन्माला आले आहात. मग, स्वातंत्र्य लढ्यात तुमचे योगदान काय आहे? स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी तुम्ही काही केले का, सर्वसामान्यांचा आवाज बनून त्यांचे दुःख कमी करण्यासाठी तुम्ही काही केले का.’
महापुरुषांबाबत अपमानास्पद बोलणाऱ्यांवर हवी कारवाई
महात्मा गांधींबद्दल काही अपवादात्मक गोष्टी बाहेर काढून त्यांना बदनाम करणे हे चुकीचे आहे. यावर भाजपने आणि मुख्यमंत्र्यांनी आपले मत स्पष्ट केले पाहिजे. सावरकर असतील किंवा इतरही महापुरुष असतील, यांच्याबद्दल वादग्रस्त बोलणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी, अशी मागणीही बच्चू कडू यांनी केली.