मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. नुकतेच त्यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत अत्यंत विवादास्पद असे विधान केले आहे. त्यांच्या त्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात येत असून त्यांच्यावर कारवाई करून तुरुंगात टाकण्याची मागणी जोर पकडू लागली आहे.
आंबे खाल्ल्याने मुले होतात, अशाप्रकारची अतार्किक विधाने करून चर्चेत राहणाऱ्या भिडे गुरुजींनी आता महात्मा गांधी यांच्या वडिलांच्या अनुषंगाने वादग्रस्त वक्तव्य केले आहे. महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहदानस करमचंद गांधी असले तरी करमचंद हे त्यांचे खरे वडील नसून गांधी यांचे वडिल एक मुस्लिम जमीनदार होते, असे विधान भिडे गुरुजींनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने खळबळ माजविली आहे. संभाजी भिडेंची यापूर्वी चंद्रपूर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, नियोजित बैठकस्थळी आंबेडकरवादी संघटनांनी आणि काहींनी विरोध केला होता. मात्र पोलिसांनी वेळीच सतर्क होत या विरोधकांना ताब्यात घेतल्याने वाद टळला. त्यानंतर, संभाजी भिडे गुरुवारी अमरावती दौऱ्यावर होते. यावेळी, संघटनात्मक कार्यक्रमात बोलताना भिडे यांनी गांधींवरील वक्तव्य केले.
असा आहे भिडेंचा दावा
मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले, त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. त्यामुळे करमचंद गांधी हे मोहनदास यांचे खरे वडील नसून ते त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत. मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम पालकाने केले असल्याचे सबळ पुरावेही उपलब्ध असल्याचा दावा यावेळी संभाजी भिडेंनी केला आहे.
अधिवेशनात उमटले पडसाद
भिडे यांच्या वक्तव्याच्या पडसाद राज्याच्या पावसाळी अधिवेशनात उमटले. संभाजी भिडे ही विकृती आहे. त्यांनी देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संदर्भात अत्यंत अवमानकारक विधान केले आहे जे समग्र देशासाठी अत्यंत अस्वस्थ करणारे आहे. आम्ही सभागृहात संभाजी भिडेंवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सरकारने आजच या विषयावर कारवाई करावी आणि सभागृहाला सूचित करावे. अन्यथा आम्ही शांत बसणार नाही, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले.