औरंगाबाद – महात्मा फुले अंधश्रद्धा कमी करण्यासाठी बहुजन समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षणाचा हक्क मिळवून दिला. समाजात आजही अंधश्रद्धेचा पगडा कायम आहे. या पगड्यातून बाहेर पडण्यासाठी महात्मा फुले यांनी लिहिलेले शेतकऱ्यांचे आसूड आणि गुलामगिरी ही दोन पुस्तके प्रत्येकाने वाचावीत. अंधश्रद्धेचा हा पगडा नक्कीच दूर होईल असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
औरंगाबाद येथे क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल यांच्या वतीने आयोजित ‘सामाजिक समता पुरस्कार’ सोहळा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार अंबादास दानवे,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन मुल्ला, माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर,नारायण मुंडे, बापू भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, शाहीर संभाजी भगत, समता परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरी धाडगे, ऍड.सुभाष राऊत,अभिजीत देशमुख,नवनाथ वाघमारे, माजी महापौर नंदकुमार घोडे, आप्पासाहेब निर्मळ, प्रा.संतोष विरकर, चंद्रकांत पेहेरकर, आनंदा ठोके, निशांत पवार,संदीप घोडके, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हाध्यक्ष मनोज घोडके यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला होता.
यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, महात्मा फुले यांनी हंटर आयोगासमोर शिक्षण द्या, शेतकऱ्यांना सुविधा द्या,कामे वाटून द्या जातीच्या प्रमाणात अशी मागणी केली. आरक्षणाचा पाया त्यांनी घातला. छत्रपती शाहू महाराज यांनी सर्वात प्रथम ५० टक्के आरक्षण दिलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटनेची निर्मिती करून देशातील नागरिकांना आरक्षण दिलं. ओबीसींसाठी न्यायिक आयोग निर्माण करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. व्ही.पी.सिंग यांनी मंडल आयोग लागू केला. त्यामुळे देशात ओबीसीना आरक्षण मिळालं. मात्र झारीतील शुक्राचार्य आजही बसलेले असून ओबीसी आरक्षण रद्द व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
ते म्हणाले की, सद्या देशात आवाज दाबण्यासाठी शासकीय यंत्रणांचा गैर वापर केला जात आहे. मात्र तरी देखील आपला लढा सुरू राहणार आहे.दादागिरी खपवून घेतली जात नाही.सत्याग्रहाच्या माध्यमातून आपला लढा सुरू राहील. दगडधोंडे मारून किंवा जेलमध्ये डांबून समाज बदलणार नाही.वैचारिक ऍलर्जी बरी होऊ शकत नाही. त्यामुळे आपलं काम थांबविता कामा नये ते अविरत सुरू रहावं. उज्वला गॅस योजना केंद्र शासनाने काढली मात्र महागाईमुळे गॅस घेणं सर्वसामान्य नागरिकांना परवडत नसल्याने पुन्हा चूल पेटवली आहे. पेट्रोल, डिझेल सह जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या असून महागाईने जनता अडचणीत आली असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच आपली दैवत आहे. छत्रपती शिवजी महाराजांनी राज्यक्रांती तर महात्मा फुले यांनी सामाजिक क्रांती घडविली.छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी कधीही सुट्टी न घेता बहुजन समाजाच्या हिताच्या दृष्टीने काम केलं. त्यामुळे जयंतीच्या निमित्ताने सुट्टी न घेता समाज हिताचे कामे करण्यात यावे असे आवाहन त्यांनी केलं. तसेच यंदाचे हे वर्ष सावित्रीबाई फुले यांचे स्मृती शताब्दी रौप्य महोत्सवी वर्ष, दि.६ मे रोजी छत्रपती शाहू महाराज यांचे स्मृती शताब्दी वर्ष साजरे होत आहे. या निमित्ताने वर्षभर विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्यात यावेत. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात यावी असे आवाहन करत औरंगाबाद येथे ओबीसी वसतिगृहाच्या प्रश्नांबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावला जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले.