नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने लवकरच उत्तर महाराष्ट्र व कोकण विभागाचा दौरा करण्यात येऊन संघटन अधिक मजबूत करण्यात येणार असून उत्तर महाराष्ट्रात ‘गाव तिथे समता परिषद’ तर शहरात ‘वार्ड तिथे समता परिषद’ अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे यांनी दिली.
प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे यांच्या अध्यक्षतेखाली आज नाशिक येथील कार्यालयात नाशिक विभागाची आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक, नाशिक पश्चिम जिल्हाध्यक्ष प्रा.ज्ञानेश्वर दराडे, नाशिक पूर्व जिल्हाध्यक्ष डॉ.योगेश गोसावी, धुळे जिल्हाध्यक्ष राजेश बागुल, जळगाव जिल्हाध्यक्ष सतीश महाजन, नंदुरबार जिल्हाध्यक्ष राजेंद्र वाघ, पंचायत समिती सदस्य मोहन शेलार, मालेगाव शहराध्यक्ष नरेंद्र सोनवणे, शहर कार्याध्यक्ष समाधान जेजुरकर, धुळे महानगराध्यक्ष गोरख देवरे उपस्थित होते.
यावेळी दिलीप खैरे म्हणाले की, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण विभागाचा दौरा करून एक महिन्याच्या आत सर्व नूतन कार्यकारिणी तयार करण्यात येणार आहे. नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येणार असून महिलांचा सहभाग अधिक वाढविण्यात येणार आहे. समता परिषदेच्या माध्यमातून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची गाव तिथे शाखा तर शहरात वार्ड तिथे शाखा निर्माण करण्यात येणार आहे. तसेच तालुकावार तसेच जिल्हावार नवीन कार्यकारिणीची निर्मिती करण्यात येणार असून संघटनेत प्रामाणिक काम करणाऱ्या सदस्यांना संधी देण्यास प्राधान्य देण्यात येणार असल्याचे दिलीप खैरे यांनी सांगितले.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक म्हणाले की, मंत्री छगन भुजबळ यांच्या सुचनेनुसार अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या कार्यकारिणीत फेरबदल करण्यात आले आहेत. नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून राज्यभरात विभागवार दौरे करून ओबीसींचा आवाज बुलंद करण्यात येणार आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आल्याने ओबीसी समाजात जनजागृती करण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांनी सांगितले.
अशा होणार उत्तर महाराष्ट्र विभागात बैठका
दि.१२ एप्रिल रोजी नवी मुंबई येथे कोकण विभागाची आढावा बैठक, दि.१३ एप्रिल ला नाशिक जिल्हा शहर व जिल्हा कार्यकारिणी बैठक, दि.२७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता मालेगाव, सायंकाळी ४ वाजता धुळे तर दि.२८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता नंदुरबार तर जळगाव येथे सायंकाळी ५ वाजता आढावा बैठक करण्यात येणार आहेत.