मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महात्मा जोतिराव फुले यांनी सन १८७३ साली स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला २२ सप्टेंबर २०२२ रोजी दीडशे वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने सत्यशोधक समाजामध्ये कार्यरत असणाऱ्या समाजसेवकांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन २६ सप्टेंबर रोजी मुंबई येथे करण्यात आले असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या समाजसेवकांचा सन्मान करण्यात येणार आहे.
सत्यशोधक समाजाच्या १५० व्या स्थापना दिनाच्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक आज राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
महात्मा जोतिराव फुले यांनी सन १८७३ साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या स्थापना दिवसाला २२ सप्टेंबर २०२२ रोजी दिडशे वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने दि.२६ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी १२.३० वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सत्यशोधक समाजातील काही समाजसेवकांचा प्रातिनिधिक स्वरूपात शरदचंद्र पवार यांच्या शुभहस्ते गौरव करण्यात येणार आहे.यामध्ये *जेष्ठ समाजसेविका कमलताई विचारे,बाबा आढाव,आ. ह.साळुंके,प्रा. रावसाहेब कसबे, भारत पाटणकर व स्व.गेल ॲामव्हेट, उत्तम कांबळे, प्रा. हरी नरके आदींचा गौरवार्थींमध्ये समावेश असेल.
यावेळी समीर भुजबळ,पंकज भुजबळ,बापू भुजबळ,प्रा.हरी नरके,शिवाजीराव नलावडे, रवींद्र पवार,सदानंद मंडलिक, प्रा. दिवाकर गमे,दिलीप खैरे,बाळासाहेब कर्डक,ऍड सुभाष राऊत, मंजिरी धाडगे,प्रा कविता म्हेत्रे, प्रितेश गवळी, अंबादास गारूडकर,डॉ.डी. एन महाजन,.डॉ. नागेश गवळी, राजेंद्र नेवसे, किरण झोडगे, कैलास मुदलियार,समाधान जेजुरकर,ज्ञानेश्वर दराडे,संतोष वीरकर यांच्यासह राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते
महात्मा जोतीराव फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाच्या विचारांवर काम करणाऱ्या समाजसेवकांचा सन्मान या शतकमहोत्सवी अमृत महोत्सवाच्या निमित्ताने करण्यात येणार आहे. तसेच सत्यशोधक समाजाच्या आठवणींना उजाळा देण्याच्या दृष्टीने उपस्थित मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत. सत्यशोधक समाज स्थापना शतकोत्तर अमृत महोत्सवी वर्ष आणि राजर्षि छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त जिल्ह्याजिल्ह्यात वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.