नाशिक – समाज कल्याण विभागामध्ये अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला चतुर्थश्रेणी कर्मचारी यांचा पदोन्नती प्रश्न समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी मार्गी लावला आहे. त्यातूनच समाज कल्याण विभागात प्रथमच ११२ चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामुळे आता समाज कल्याण मध्ये वर्षानुवर्षे शिपाई म्हणून काम केलेले कर्मचारी आता लिपिक बनणार आहे.
गेले अनेक वर्ष समाज कल्याण विभागात शिपाई या पदावर उत्कृष्ट सेवा केलेल्या राज्यातील विभागांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या यात समावेश आहे. शिपाई संवर्गातून कनिष्ठ लिपिक या पदावर या कर्मचा-यांना पदोन्नती देण्यात आली आहे. त्यांच्या केलेल्या कार्याची दखल विभागाने घेऊन त्यांच्या पदोन्नती प्रश्न निकाली काढला आहे. तसेच कनिष्ठ लिपिक संवर्गातून लघुटंकलेखक संवर्गात-१, निम्मश्रेणी लघुटकलेखक संवर्गातून उच्चश्रेणी लघुलेखक-१ व उच्च श्रेणी लघुलेखक संवर्गातून स्वीय सहाय्यक राजपत्रित-३ या तिन्ही संवर्गातील एकुण ५ कर्मचारी यांनाही पदोन्नती देण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश नुकतेच निर्गमित करण्यात आले आहेत. श्री प्रशांत चव्हाण उपायुक्त (प्रशासन) समाज कल्याण आयुक्तालय पुणे व त्यांच्या आस्थापना शाखेने यासाठी विशेष परिश्रम घेऊन आदेश निर्मित केले.
विभागाचे कामकाज अधिक गतिमान व लोकाभिमुख होण्यासाठी कर्मचाऱ्यांचे प्रश्न देखील महत्त्वाचे आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना आयुक्तालयाच्या वतीने प्रश्नांची सोडवणूक करून न्याय दिला जात असल्याचे आयुक्त यांनी सांगून सर्व पदोन्नती झालेल्या कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. कर्मचाऱ्यांनी गेल्या दोन वर्षाच्या काळात राबवलेल्या उपक्रम तसेच विविध मोहीमा या यशस्वी करून दाखवल्याने व कामकाजात सुधारणा झाली आहे. उत्कृष्ठ काम करणा-या आदर्श कर्मचाऱ्यांचा देखील लवकरच विभागाच्या वतीने गौरव करणार येणार आहे.
समाज कल्याण विभागाच्या इतिहासात प्रथमच मोठ्यासंखेने शिपाई संवर्गातून कनिष्ठ लिपिक या पदावर या कर्मचा-यांना पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचारी यांनी आनंद व्यक्त केला असून शासनाचे आभार मानले आहेत. समाज कल्याण विभागातील समाज कल्याण निरिक्षक, कार्यालय अधिक्षक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक , शिपाई या वर्ग ३ व वर्ग ४ संर्वगातील कर्मचा-यांना सुधारित सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देखील नुकताच देण्यात आला आहे. विभागाअंतर्गत सेवा अर्हताकारी परिक्षेचा प्रश्न देखील आयुक्त यांनी मार्गी लावला जवळपास ६०९ कर्मचारी यांच्या परिक्षा नुकत्याच संपन्न झाल्या आहेत. कर्मचारी सेवा पुर्नस्थापित / नियमित वेतनश्रेणीचा प्रश्न मार्गी लावला आहे, नागरिक उन्मुख प्रशासकीय गतीमानता अभियान, कर्मचारी कौशल्य विकास अभियान ,कामात सुसूत्रता , अभिलेखे अद्यावत करणे, कामात गतिमानता/ डेली डिस्पोजल, प्रशिक्षण , गुणवंत कर्मचारी अधिकारी / कर्मचारी ,कर्मचारी दिन संकल्पना , योजनांची मार्गदर्शिका तयार करणे, यासारखे उपक्र्म समाज कल्याण विभागात आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनतुन राबविण्यात आले आहेत.
निर्णय स्वागतार्ह
विभागाने आमच्या पदोन्नतीच्या संदर्भात घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून त्याबद्दल आम्ही शासनाचे आभारी आहोत. आता शिपाई संवर्गातून लिपिक संवर्गात पदोन्नती झाल्याने आमची जबाबदारी देखील वाढणार असून जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा आम्ही प्रयत्न करू.
लखन मोरे, पदोन्नती झालेली कर्मचारी
…………..
इतर संर्वगाच्या देखील पदोन्नती प्रश्न मार्गी लागणार
समाज कल्याण विभागाचे मंत्री धनंजय मुंडे, व सचिव सुमंत भांगे यांच्या नेत्वृता व मार्गदर्शनाखाली विभागात अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत, त्यातुन प्रशासकीय गतिमानता निर्माण करण्याचा प्रयत्न विभागाकडून करण्यात येत आहे. उत्कृष्ठ काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांना विभागाने प्रोत्साहन दिले आहे. अश्याच उत्कृष्ठ काम करणारे चतुर्थश्रेणी कर्मचारी यांचा अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला पदोन्नती प्रश्न मार्गी लावून कर्मचारी यांच्या मागणीला न्याय दिला आहे. येणा-या काळात इतर संर्वगाच्या देखील पदोन्नती प्रश्न मार्गी लागणार आहे.
डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाज कल्याण महाराष्ट्र राज्य, पुणे