सामाजिक समतेचे जनक राजर्षी शाहू महाराज
अर्वाचीन महाराष्ट्राच्या इतिहासात ज्यांचे नाव टाळणे शक्य नाही असे कर्तुत्व कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती शाहू महाराज यांचे आहे. शाहू महाराजांनी आपल्या राज्यात समता प्रधान समान रचना, लोकशाही आणि समाजवाद रुजविण्याचा प्रयत्न केला. सामाजिक समतेची प्रतिष्ठापना हे त्यांचे मुख्य उद्दीष्ट होते.
– डॉ. सर्जेराव जयवंतराव भामरे (मुख्य सचिव, राजवाडे इतिहास संशोधन मंडळ,धुळे)
शाहू महाराजांच्या भाषणांतून होणारी व्यक्त होणारी सामाजिक समतेची तळमळ त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून आपल्या खाजगी व्यवहारातही उतरविली व अशी समता आपल्या राज्यात प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. ‘अस्पृश्यता ही जगाच्या पाठीवर हिंदुस्थानशिवाय कुठेही नाही. हे जातीभेदाचे हिडीस स्वरुप असून ते लज्जास्पद आहे’ असे उद्गार शाहू महाराजांनी नाशिकच्या सभेत काढले. माणगांवच्या सभेत शाहू महाराजांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या बरोबर भोजन घ्यावे अशी विनंती केली, त्यांच्याबरोबर त्यांनी सहभोजन केले.
भटक्या विमुक्त जातीच्या उद्धारासाठी आपल्या राज्यात रोजगार दिलेत. सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळण्यास त्यांनी कायद्याने प्रतिबंध केला. त्यासाठी अनेक वटहुकूम जारी केले. त्यांनी अस्पृश्यांना सरकारी नोकरीत घेतले. समाजातील तलाठ्यासारख्या प्रतिष्ठेच्या जागा दिल्या. त्यांच्यापैकी अनेकांना माहूत, हूलस्वार, पोलीस, स्वत:चे मोटारचालक म्हणून नेमले. खेड्यापाड्यांतील बलुतेदारांनाही त्यांच्या बलुतेपद्धतीतून मुक्त करून त्यांना समाजातील सर्व उद्योगधंदे खुले केले.
प्रेमाने वागविले तर गुन्हेगार समजली जाणारी माणसेदेखील बदलतील, आपला विकास साधतील असे नवे मानवतावादी समीकरण महाराजांनी मांडले. रोटीबंदी, बेटीबंदी व व्यवसाय बंदी हे तीन निर्बंध जाती व्यवस्थेत होते. ते समूळ नष्ट केल्याशिवाय जातीभेद समूळ नष्ट होणार नाही म्हणून त्यांनी आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा केला. जाती व्यवस्थेतील व्यवसायबंदी उठवली. त्यांनी व्यवसाय स्वातंत्र्य देवून एक प्रकारच्या सामाजिक गुलामगिरीतून जनतेची मुक्ती केली. समाजात आमुलाग्र बदल घडवून भारतीय प्रबोधनात एक नव आयाम निर्माण केला.
समाजात महिलांना सन्मानाचे स्थान मिळावे यादृष्टीने छत्रपती शाहू महाराजांनी प्रयत्न केले. त्यांनी आपल्या संस्थानात विधवांच्या पुनर्विवाहास कायदेशीर मान्यता देणारा कायदा केला. बालविवाहास प्रतिबंध करून नोंदणी विवाहाचा कायदा जारी केला. राजर्षी शाहू महाराजांनी घटस्फोटास व विधवापुनर्विवाहास कायदेशीर मान्यता दिली. कुटुंबात होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळांपासून स्त्रीला संरक्षण देणारा कायदाही त्यांनी मंजूर केला. पाऊणशे वर्षापूर्वी स्त्रियांच्या उद्धाराचा विचार करुन असे निर्णय प्रत्यक्षात अंमलात आणणे हे मोठे क्रांतीकारक व कौतुकास्पद कार्य होते.
छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक, साहित्यीक, क्रिडा, संगीत, कृषी व आरक्षण या क्षेत्रात अमूलाग्र सुधारणा घडवून आणण्याचे प्रयत्न केलेत विविध जाती जमातीच्या मुलांसाठी वसतिगृहे निर्माण केली. त्यांनी शिक्षण क्षेत्राच्या प्रगतीसाठी चांगले निर्णय घेतले. मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला. स्त्री शिक्षणास प्रोत्साहन, विद्यार्थी व संस्थाना उदार सहाय्य, आर्यसमाज तसेच सत्यशोधक समाज, सत्यशोधक वृत्तपत्रे, सत्यशोधक जलसे यांना आर्थिक पाठबळ देऊन मार्गदर्शन केले.
छत्रपती शाहूराजांचे कार्य बहुअयामी होते. सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणीक, राजकीय पैलूंसोबत मानवी जीवनातील प्रत्येक क्षेत्रात विकास साधणारे विचार समाजात रुजविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. राज्यातील जनतेच्या उत्कर्षाला पूरक ठरेल असे कार्य केले. अज्ञानी समाजाला जागृत करण्याचे कार्य त्यांनी अखेरपर्यंत केले. त्यांच्या कार्यामुळेच ‘दलित-पतितांचा उद्धारक’ म्हणून त्यांची प्रतिमा जनमानसात निर्माण झाली.