नाशिक – मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी समाजविकास पॅनल तर्फे सरचिटणीस पदाचे उमेदवार नितीन ठाकरे यांच्यासह त्यांच्या पॅनलचे उमेदवार हे मंगळवार ९ ऑगस्ट रोजी सकाळी ११.३० वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. त्यानंतर धनदाई लॉन्स येथे सभासदांचा मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती पॅनलतर्फे देण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी आतापर्यंत २७३ उमेदवारी अर्ज सभासदांनी नेले आहे. त्यामुळे या निवडणुकीत चुरस वाढली आहे. सत्ताधारी गटाच्या विरोधात समाजविकास पॅनल मैदानात उतरले असून त्यांच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रविवारी निफाड तालुक्यात समाजविकास पॅनेलची निफाड तालुक्यातील सात गावांत आढावा बैठक संपन्न झाली. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर ॲड नितीन बाबुराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली समाजविकास पॅनलने दुसऱ्या दिवशी आढाव बैठक घेत सभासदांच्या भेटी घेतल्या. तालुक्यात रविवारी सकाळपासून शिरवाडे वणी, गोरठाण, पालखेड, सारोळे, खडकमाळेगाव, वनसगाव, ऊगाव येथे सभासदांच्या भेटी घेत आढावा बैठक घेतली.यावेळी नितीन ठाकरे यांनी आगामी निवडणुकीत जो पॅनल निर्माण होईल त्याच्या पाठीशी उभे राहून परिवर्तन करण्याचे आव्हान उपस्थित सभासदांना केले. आमदार माणिकराव कोकाटे, बाळासाहेब क्षीरसागर, प्रवीण जाधव, रवींद्र पगार, डी.बी.मोगल, शिरीष कोतवाल, रमेश पिंगळे, विश्वास मोरे, बाबुराव तांबे, राजेंद्र डोखळे, अशोक कुंदे, माधवराव ढोमसे, ॲड निफाडे, शरद काळे, राजेंद्र थेटे, कचुभाऊ शिंदे आदी उपस्थित होते.