विशेष प्रतिनिधी, नाशिक
राज्यभरातील रस्ते, वाड्या-वस्त्यांच्या नावातून जात हद्दपार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने १० डिसेंबर २०२० रोजी घेतला आहे. मात्र अद्याप याबाबत स्थानिक स्वराज्य संस्थांकडून अपेक्षित प्रतिसाद लाभ नसल्यामुळे समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी संबंधित जिल्ह्याच्या समाज कल्याण अधिकाऱ्यांना संबंधित विषयावर १५ दिवसाच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे राज्यभरातील वाड्या-वस्त्यांच्या नावातून जात हद्दपार करण्याच्या विषयाला गती आली आहे.
गावागावांमधील वाड्या-वस्त्यांचा महारवाडा, बौध्दवाडा, मांगवाडा, ढोरवस्ती, चांभारवाडी असा उल्लेख केला जातो. वस्त्यांच्या नावाला जात जोडण्याची ही प्रथा बंद करावी आणि त्याऐवजी आता या वस्त्या-वाड्यांचे समतानगर, क्रांतिनगर, भीमनगर, ज्योतीनगर, शाहूनगर असे नामकरण करण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे. रस्ते, वाड्या-वस्त्यांच्या नावांमध्ये जाती-जमातींचा उल्लेख करणे अनुचित आहे. असे शासनाचे मत आहे.
समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या निर्देशानुसार नाशिक प्रादेशिक उपायुक्तांनी नाशिक विभागातील सर्व क्षेत्रिय अधिकाऱ्यांची दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून १५ जून २०२१ रोजी बैठक घेतली. नाशिक जिल्ह्यात २७७ वस्त्या आहेत. याबाबत नाव बदलण्यासाठी ५ तालुक्यातून प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. तर उर्वरित 6 तालुक्यातून प्रस्ताव लवकरच प्राप्त होणार आहेत. तर नाशिक मधील ३ तालुक्यात वस्त्यांचे नांव बदलण्याची आवश्यकता नसल्याची माहिती जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाने दिली आहे.
समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्तांना या विषयावर विनंती करणारे अर्धशासकीय पत्र १६ जून रोजी लिहले आहे. यापत्राची तात्काळ दखल घेत. त्याच दिवशी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी १६ जून २०२१ रोजी दूरदृष्य प्रणालीद्वारे पाचही जिल्हयातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांची बैठक घेतली. रस्ते, वाड्या-वस्त्यांच्या नावातून जातीचा उल्लेख काढून तात्काळ नवीन नांवे देण्यात यावीत. असे आदेश दिले आहेत.