नशिक – सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांचेकडून तृतीयपंथीय व्यक्तींसाठी National Portal For Transgender Persons -https:transgender.dosje.gov.in राष्ट्रीय पोर्टल सुरु करण्यात आले आहे. सदर पोर्टलवर तृतीयपंथी व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळणेसाठी अर्ज करण्याबाबतची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मात्र सदर पोर्टलवर नोंदणी करण्याचे प्रमाण अत्यंत अल्प आहे, त्यामुळे राज्यातील तृतीयपंथीय व्यक्तींची निश्चित आकडेवारी उपलब्ध होत नसल्याने त्यांचेसाठी नाविन्यपूर्ण व कौशल्य विकासाच्या योजना राबविण्यास अडचणी निर्माण होत आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्याच्या समाज कल्याण विभागाने आता यासाठी पुढाकार घेतला आहे.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दिनांक २३ मे २०२२ ते दिनांक १४ जुन २०२२ या कालावधीत विशेष शिबीराचे आयोजन करण्याच्या सुचना समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी नुकत्याच दिल्या आहेत.सदर विशेष शिबीरात तृतीयपंथीय व्यक्तींची सदर पोर्टलवर नोदणी करण्याबरोबरच तृतीयपंथीय व्यक्तींना तात्काळ प्रमाणपत्र व ओळखपत्र उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही करणेबाबत सुचित आले आहे. नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये दिनांक ३० मे ते ३ जून या दरम्यान तर नाशिक येथे दिनांक ३० मे रोजी हे विशेष शिबिर होणार आहे.
तृतीयपंथी यांचे हक्कांचे संरक्षण व कल्याण योजनेंतर्गत त्यांच्या विकासासाठी, तसेच त्यांच्या हक्काची जाणीव व्हावी, उपाययोजनांची माहिती व्हावी व जनजागृती करणे इत्यादींसाठी स्वयंसेवी संस्थांमार्फत तसेच प्रशासनाच्यावतीने तृतीयपंथीयांसाठी सांस्कृतिक संम्मेलन/ कार्यशाळा आयोजित करणेसाठी प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण विभाग (सर्व) यांचेमार्फत सहायक आयुक्त, समाजकल्याण (संबंधीत) यांना निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. समाज कल्याण आयुक्तालय, पुणे येथे तृतीयपंथी समूहाचे सामाजिक सहभाग, स्वावलंबन, आरोग्य, स्वयंरोजगार नोंदणी, यावर नुकताच संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पुणेरी प्राईंड संस्था, मैत्र क्लिनिक, गायत्री परिवाराचे प्रतिनिधी यांनी राष्ट्रीय निसर्गोपचार संस्थान, आयुष विभाग, आरोग्य मंत्रालय भारत सरकार, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा व सत्र न्यायालय, पुणे, इस्कॉन शोध आरंभ रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाऊंडेशन, पुणे वं श्री संत जगद्गुरू संत तुकाराम फाउंडेशन फोर फिलांथ्रोपी हे प्रतिनिधी उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये तृतीयपंथीयांची नोंदणी करणे, याबाबत प्रथम प्राधान्य देवून सदर नोंदणीसाठी विशेष उपक्रम घेऊन त्यांची नोंदणी करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे.त्या अनुषंगाने आयुक्त समाज कल्याण यांनी निर्देश दिले आहेत. स्वयंसेवी संस्था आणि त्यांचे प्रतिनिधी यांचे सहाय्याने प्रत्येक जिल्ह्यात एकदिवशीय शिबीराचे आयोजन करण्यात येत आहे.
सर्व घटकांनी सहकार्य करावे
राज्यातील तृतीयपंथीय व्यक्तींची निश्चित आकडेवारी (माहिती) उपलब्ध नसल्याने त्यांच्यासाठी विकासाच्या योजना राबविण्यास अडचणी निर्माण होत आहे. या अडचणी दूर होण्यासाठी व राज्यातील तृतीयपंथी यांच्या विकासाकरिता धोरण निश्चित करण्यासाठी तृतीयपंथी यांची नोदंणी होणे आवश्यक आहे, त्यासाठी संपुर्ण राज्यात विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तृतीयपंथीय व्यक्तींच्या कल्याणासाठी काम करणा-या समाजातील सर्व घटकांनी यासाठी सहकार्य कारावे..
डॉ.प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाज कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य, पुणे.