साल्हेर किल्ल्यावर साकारले जाणार हे केंद्र… तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर…
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जागतिक वारसास्थळ ठरलेल्या जिल्ह्यातील साल्हेर किल्ला येथे नमो पर्यटन माहिती व सुविधा केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने पाच कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली असून त्यापैकी एक कोटी २५ लाख रुपयांचा निधी वितरीत केला आहे. याबाबत राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने शासन आदेश निर्गमित केला आहे.
जिल्ह्यातील साल्हेर किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळांचा यादीत समावेश करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पर्यटन स्थळांच्या ठिकाणी मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेंतर्गत राज्यातील ७५ पर्यटनस्थळी पर्यटकांसाठी आधुनिक मूलभूत सोयीसुविधांयुक्त नमो पर्यटन माहिती व सुविधा केंद्र स्थापन करण्यास राज्य शासनाने गेल्या महिन्यात मान्यता दिली आहे.
या योजनेच्या पहिल्या टप्प्यात प्रतापगड, शिवनेरी, साल्हेर आणि रायगड या किल्ल्यांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी पर्यटन केंद्रासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार या केंद्रांच्या विकासासाठी एक कोटी २५ लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. त्यासाठी पर्यटन संचालनालय कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून काम करणार आहे.
पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती, स्थानिक अर्थव्यवस्थेस बळकटी देणे, पर्यटन क्षेत्रात गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे व राज्याला जागतिकस्तरावर एक नामांकित पर्यटन हब म्हणून नावारूपाला आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
त्याचाच एक भाग म्हणून या सुविधा केंद्रात पर्यटन स्थळ व प्रवासाची माहिती, टूर ऑपरेटर्सची जोडणी, सुरक्षा केंद्र, आपत्कालिन सेवा प्रथमोपचार, डिजिटल प्लॅटफार्मच्या माध्यमातून एआर- व्हीआर अनुभव कक्ष, बहुभाषिक साहाय व कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेवा, दिव्यांग व वृद्धांकरीता विशेष सुविधा, महिला व शिशू कक्ष, उपहार गृह, अत्याधुनिक स्वच्छतागृहे, इव्ही चार्जिंग स्टेशन आदी सुविधांना प्राधान्य देण्यात येणार आहे. या सुविधा केंद्रामुळे पर्यटन वृद्धी होऊन स्थानिक पातळीवर रोजगारालाही चालना मिळण्यास मदत होणार आहे.








