नाशिक : रेमडेसिवीर इंजेक्शनची नाशिक शहरात काळा बाजार सुरूच असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. चढ्या भावाने इंजेक्शन विक्री करतांना अंबड पोलीसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून दोन इंजेक्शनसह कार जप्त करण्यात आली आहे. संशयीतांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अमोल रमेश देसाई (३६ ,रा . विनयनगर, इंदिरानगर) व निलेश सुरेश धामणे (४१, रा. आसावरी चेंबर्स , कॉलेज रोड) अशी अटक केलेल्या संशयीतांची नावे आहेत. मुंबई आग्रा महामार्गावरील राणेनगर बोगद्याजवळ शुक्रवारी (दि.७) मध्यरात्री दोन इसम बेकायदा रेमडेसिवीर इंजेक्शनची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. या काळाबाजाराचा भांडाफोड करण्यासाठी पोलीसांनी अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक सुरेश साहेबराव देशमुख यांना पाचारण करून सापळा लावला होता. बनावट ग्राहकाच्या माध्यमातून संशयीतांशी संपर्क साधण्यात आला. यावेळी अनुक्रमे ३४९४ आणि ५४०० रूपये किमतीच्या इंजेक्शन पोटी ४८ हजार रूपयांची मागणी करण्यात आली. हा व्यवहार निश्चित झाल्यानंतर भेटण्याचे ठिकाण ठरविले असता एमएच ०४ एवाय ३७५१ या होंडा सिटी कारमधून आलेले भामटे पोलीसांच्या हाती लागले. राणेनगर बोगदा येथे बनावट ग्राहकाने कारमधील संशयीतांकडून ठरल्याप्रमाणे इंजेक्शन खरेदी केले असता पोलीसांनी झडप घालून संशयीतांना अटक केली. त्यांच्या अंगझडतीत दोन इंजेक्शन व काही रोख रक्कम मिळून आली असून कारसह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक देशमुख यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीतांना न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.