मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कंपन्यांमध्ये पगारवाढीचा हंगाम सुरू आहे. महागाई वाढत असल्याने समाधानकारक पगारवाढ मिळावी, अशी प्रत्येक नोकरदाराची अपेक्षा असते. मात्र, आज देशभरात एका जबरदस्त पगारवाढीची चर्चा होत आहे. कारण, वर्षाचे ५० कोटींचे पॅकेज आता थेट तब्बल ७९ कोटी झाले आहे. ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून इन्फोसिस या बहुराष्ट्रीय आयटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सलील पारेख आहेत. त्यांच्याच पगारवाढीचे वृत्त सध्या सर्वत्र झळकते आहे.
देशातील आघाडीची आयटी कंपनी इन्फोसिसचे सीईओ सलील पारेख यांच्या पगारवाढीचा तपशील आला आहे. इन्फोसिसने दिलेल्या माहितीनुसार, सलील पारेख यांच्या पगारात ८८ टक्के वाढ झाली आहे. या वाढीनंतर आता पगार 79.75 कोटी रुपये प्रतिवर्ष झाला आहे. तथापि, यापैकी 11 कोटी रुपये राखून ठेवलेले आहेत तर 68.75 कोटी रुपये कामगिरीवर आधारित पॅकेज आहे. त्या तुलनेत, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (TCS) चे CEO राजेश गोपीनाथन यांना आर्थिक वर्ष 2022 मध्ये एकूण 25.8 कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे.
तथापि, सलील पारेख यांना कंपनीने सीईओ आणि एमडी म्हणून पुन्हा नियुक्त केल्यावर पगारवाढ मिळाली. पारेख यांचा कार्यकाळ 1 जुलै 2022 पासून सुरू होईल आणि 31 मार्च 2027 रोजी संपेल. इन्फोसिसने सांगितले की, सलील पारेख यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने नफा कमावला आहे. पारेख यांच्या कार्यकाळात, कंपनीचे बाजार भांडवल सुमारे ₹577,000 कोटी (सुमारे $69 अब्ज) वाढले. सलीलच्या नेतृत्वाखाली, कंपनीच्या महसूल वाढीचा वेग रु. 70,522 कोटी (FY 2018) वरून रु. 1,21,641 कोटी (FY 2022) पर्यंत वाढला आहे, असे इन्फोसिसच्या निवेदनात म्हटले आहे. सलील पारेख यांचा पगार 2020-21 या आर्थिक वर्षात 49.68 कोटी रुपये होता. यामध्ये 6.07 कोटी रुपयांचा पगार, 12.62 कोटी रुपयांचा बोनस, भत्ते किंवा परिवर्तनीय वेतन आणि 30.99 कोटी रुपयांचे शेअर मूल्य समाविष्ट आहे.