विशेष प्रतिनिधी, मुंबई
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनीच्या घरी एका खास पाहुण्याचे आगमन झाले आहे. माहीची पत्नी साक्षी हिनेच याबाबत माहिती दिली आहे. या नव्या पाहुण्याचे नाव चेतक आहे. आणि माहीच्या परिवारातील लिलीशी त्याची खास दोस्ती झाली आहे. साक्षीने याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. लिली म्हणजे माहीची कुत्री तर चेतक म्हणजे एक घोडा आहे.
धोनीला जनावरे पाळण्याची आवड आहे. त्याच्याकडे अनेक प्रकारचे कुत्रे आहेत. यातील काही विदेशी प्रजातींचे आहेत. धोनीकडील सॅम नावाचा कुत्रा बेल्जियम मॅलिनोइज प्रजातीचा असून त्याची किंमत ७५ हजार रुपये आहे. लिली आणि गब्बर हस्की तर जोया डच शेपर्ड प्रजातीचे आहेत.
जनावरे पाळण्यासोबतच धोनीला शेतीची देखील आवड आहे. त्यामुळे रांचीपासून थोडे लांब असणाऱ्या त्याच्या ४३ एकरांच्या फार्म हाऊसवर त्याने अनेक प्रकारची शेती केलेली दिसते. मटार, टोमॅटो, पपई यांबरोबरच इथे स्ट्रॉबेरीची देखील शेती होते. याला तेथे खूप मागणी देखील आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर धोनी जेव्हा घरी असतो, तेव्हा त्याचा वेळ या फार्महाऊसवर शेती करण्यात जातो. धोनीच्या या फार्महाऊसवर एक पोल्ट्री फार्म देखील आहे. त्यात मध्यप्रदेशातील झाबुआ येथून कडकनाथ कोंबड्या आणून ठेवल्या आहेत. माहीला नॉनव्हेजची विशेष आवड आहे. या कोंबड्यांचे मांस मधुमेहींसाठी चांगले असते, असे मानले जाते.
धोनीच्या या सगळ्या गोतावळ्यामध्ये आता चेतकची भर पडली आहे. बाईकवरून फिरायला आवडणारा धोनी काही दिवसांनी चेतकची रपेट करताना दिसला तर आश्चर्य वाटायला नको, नाही का?