युवा मित्र, सी.एल.पी. इंडियाच्या वेबिनारमध्ये देवरे यांचे प्रतिपादन
साक्री -जास्त उत्पादनाच्या हव्यासापायी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खतांचा वापर केल्याने शेती कुपोषित बनली असून शेतीचं कूपोषण संपवण्यासाठी आता शेतकऱ्यांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. शेतीचा शोध लावणाऱ्या महिलाच यात अग्रभागी राहिल्या तर शेती कूपोषण मुक्त होण्यास वेळ लागणार नाही असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते संदीप देवरे यांनी केले.
‘
युवा मित्र’, ‘सी.एल.पी. विंड फार्म (इंडिया) प्रा.लि.’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमा’च्या अंतर्गत ‘पर्यावरण दिनी’ आयोजीत वेबिनारमध्ये ते बोलत होते. सी.एल.पी. इंडियाच्या सी.एस. आर. व्यवस्थापक नीतू कुमार, ‘युवा मित्र’च्या कार्यकारी संचालक मनीषा पोटे, सेक्रेटरी विलास पाटील, असोसिएट संचालक शीतल डांगे यांच्यासह भामेर, पेरेजपूर, साल्टेक येथील बचत गटाच्या महिला, शेतकरी यावेळी उपस्थित होते. आपल्या वाड-वडिलांच्या काळात केवळ शेतीच नव्हे तर संपूर्ण निसर्ग समृद्ध होता. शेताच्या बांधावर विविध प्रकारची फळझाडे होती. याच झाडांच्या खाली विविध प्रकारच्या वेली बहरत असायच्या. त्या काळात आताच्यासारखी बांधावरून भांडणे होत नव्हती. तर संपूर्ण पिढी सुदृढ ठेवण्याचं काम या फळझाडांच्या माध्यमातून होत होतं. खटल्याच्या घरासाठी लागणारा भाजीपालाही तेथेच पिकवला जात होता. घरी असणाऱ्या दुभत्या जनावरांमुळे लहान मुलांसह शेतीचंही भरण-पोषण होत होतं. मधमाशांपासून छोटे-छोटे जीवाणू,पशु-पक्ष्यांसह संपूर्ण निसर्गाला जगवण्याचं काम त्यातून होत होते. एखाद्या पिकावर येणाऱ्या रोगाच्या कीटकांचा नाश होत होता. शेतीसह परिसरातील टेकड्या-डोंगरही समृद्ध होते. विविध फळा-फुलांच्या झाडांनी ते नटलेले होते. मात्र, जास्त उत्पादन मिळण्याच्या हव्यासापोटी आपण रासायनिक खतांचा वापर सुरु केला आणि शेतीला आवश्यक असा पोषण आहार न मिळाल्याने शेती नापीक बनत गेली. शेतीच्या बांधावरील लिंबाच्या झाडांसह इतर झाडांच्या पाला-पाचोळ्यापासून शेतीला आवश्यक असणारा आहार मिळत होता. मात्र, आपल्या हव्यासाने त्यापासून शेतीला वंचित केले. वृक्षांची मोठ्या प्रमाणावर तोड केली. टेकड्या-डोंगरांवर आता गवतही उगवत नाही एवढा आपण निसर्गाचा ऱ्हास केला. रस्ते बनवताना रस्त्याच्या कडेला असणारी झाडे गायब झाली. नैसर्गिक पाण्याचे स्रोत असणारे छोटे नाले गायब झाले. रस्त्याने जाताना ऊन, वारा, पावसात हीच झाडे आपल्याला आसरा द्यायची याकडे देवरे यांनी लक्ष वेधले. पुढच्या पिढीचं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर आपल्याला पुन्हा एकदा शेतीला नैसर्गिकदृष्ट्या सुदृढ करावे लागेल. शेतीतील मातीचे परीक्षण करून त्यातील अनावश्यक घटक कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्या लागतील. त्या मातीत ज्यांचे भरण-पोषण होईल अशा पिकांवर जोर द्यावा लागेल. घरासाठी आवश्यक असणारा भाजीपाला आपल्याच परसबागेत फुलवावा लागेल. शेतीचा शोधच महिलांनी लावला असून शेतीला पुन्हा संपन्नतेकडे नेण्यासाठी महिलांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. शेतीला पोषक ठरणारी, आपल्यासह संपूर्ण सजीव सृष्टीला, पशू-पक्ष्यांना पोषक ठरणारी झाडे लावावी लागतील. पर्यावरण वाचले तरच संपूर्ण सृष्टी वाचणार आहे याचे भान सर्वांनी ठेवावे व पर्यावरण वाचवण्यासाठी सर्वांनी हातभार लावावा असे आवाहन देवरे यांनी केले. पर्यावरणाचा ऱ्हास केल्याची किमत आपल्या सर्वांनाच कोविडच्या आजच्या काळात भोगावी लागली असून ऑक्सिजनचा तुटवडा झाल्याने देशभरात अनेकांना आपले जीव गमवावे लागले असल्याचे नीतू कुमार म्हणाल्या. प्रकल्प व्यवस्थापक योगेश पगारे यांनी प्रास्ताविक केले.
प्रत्येक गावाने विकास आराखडा तयार करावा
प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतात झाडे लावण्याचा निर्णय घेतल्यास शासनाच्या रोजगार हमी योजनेतून बांधावर खड्डे खोदण्यासाठी शेतकऱ्यांना प्रती दिन २३७ रुपये सामाजिक वनिकरण विभागाकडून मिळू शकतात. ते झाड वाढवण्यासाठी, त्याला पाणी देण्यासाठी पुढील ३ वर्षांसाठी आर्थिक मदत मिळू शकते. साक्री तालुका भौगोलिक दृष्ट्या राज्यातील सर्वात मोठा तालुका असून प्रत्येक गावाने ग्राम पंचायत, शासकीय विभाग व शेतकऱ्यांना सोबत घेऊन पर्यावरण वाचवण्यासाठी स्वत:च्या गावाचा विकास आराखडा बनवला तर संपूर्ण तालुका पुन्हा हिरवाईने नटलेला बघायला मिळेल असा विश्वास देवरे यांनी व्यक्त केला.