अक्षय कोठावदे, पिंपळनेर (ता. साक्री)
पांजरा नदीचे उगमस्थान असलेल्या शेंदवड भवानी डोंगर व परिसरात मुसळधार पावसामुळे पिंपळनेर येथील पांजरा नदीला या वर्षात प्रथमच पूर आला आहे. उशिरा का होईना नदीला पूर आल्यामुळे परिसरातील शेतकरी वर्ग व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे पांजरा नदीला पूर आला आहे. यंदा पावसाने दमदार हजेरी लावली नव्हती. मात्र, पावसाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात जोरदार पाऊस झाल्याने बळीराजामध्ये समाधानाचे वातावरण आहे. शेतपिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
सतर्कतेचा इशारा
पिंपळनेर जवळील लाटीपाडा धरणातून ७०९६ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे नदीची पाणी पातळी वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाच्यावतीने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सेल्फी प्रेमींचा उच्छाद
ऋतु कोणताही असो सेल्फी प्रेमींचा मोह आवरला जात नाही. या आतिमोहापायी अनेकांना जीव गमवावा लागतो. आताही पिंपळनेर परिसरात तीच स्थिती आहे. पूर आलेल्या नदी पात्राजवळ जाऊन अनेक तरुण सेल्फी घेत आहेत. त्यामुळे अपघात घडण्याची शक्यता आहे. परिणामी, युवकांनी स्टंटबाजी करणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.