त्र्यंबकेश्वर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लव्ह जिहाद व धर्मांतरण विरोधी कायदा राज्यासह संपूर्ण देशात लागू करण्यात यावा, गोवंश हत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी सकल हिंदू समाज त्र्यंबकेश्वर शहर व तालुक्याच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळ सकाळी दहा वाजता विविध आखाड्यांचे साधु महंत व विविध राजकीय पक्ष, संघटनेचे पदाधिकारी, सकल हिंदु समाजाचे असंख्य कार्यकर्ते जमा झाले. कोणी भगवे शर्ट, भगव्या टोप्या, भगवे उपरणे परिधान केले होते. महिलांची संख्या देखील लक्षणीय होती. हातात विविध घोषणांचे फलक होते. छत्रपती शिवाजी महाराज चौक, त्र्यंबकेश्वर मंदिर, लक्ष्मीनारायण चौक, पाचआळी, जोगळेकर वाडा, बल्लाळेश्वर मंदिर, तेली गल्ली, सुंदराबाई मठ, नगर पालीका कार्यालय मार्गे मोर्चा डॅा. बाबासाहेब आंबेडकर चौकात मोर्चाची सांगता करण्यात आली.
याठिकाणी महिला मोर्चेकर्यांचे वतीने तहसीलदार दीपक गिरासे यांना निवेदन देण्यात आले. शांततेच्या मार्गाने मोर्चा नेण्यात आला. पोलीस निरीक्षक संदिप रणदिवे यांचे मार्गदर्शनाखाली पो.उ.नि. अश्विनी टिळे, राणी डफळ, चंद्रभान जाधव, यल्लाप्पा खैरे व सहकार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.