इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – प्रभास आणि सैफ अली खानचा नुकताच समोर आलेला ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होताच वादात सापडला आहे. या चित्रपटातील VFX सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहेत. यासोबतच सैफच्या या चित्रपटातील लूकवरही मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर टीका होते आहे.
हा ‘आदिपुरुष’ खरा नाही तर ऍनिमेटेड वाटतो, अशी नेटिझन्सची पहिली प्रतिक्रिया आहे. या चित्रपटात सैफ अली खान रावणाच्या भूमिकेत आहे. मात्र, त्याचा हा लूक काही नेटकऱ्यांना पसंत आलेला नाही. अखिल भारत हिंदू महासभा तसेच संत महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनी सैफच्या या अवताराचा निषेध केला आहे. सैफ अली खान हा लंकापती रावण नाही तर चंगेझ खान किंवा औरंगजेबासारखा दिसत असल्याचे चक्रपाणी महाराज यांचे म्हणणे आहे. हिंदू संस्कृती आणि पौराणिक व्यक्तिरेखा या कायम मस्करीचा विषय का होतात, हे कळत नाही. कायमच त्यांच्याशी छेडखानी होते, असेही ते म्हणाले.
भाजप प्रवक्त्या मालविका यांनी देखील ‘आदिपुरुष’वर टीका केली आहे. वाल्मिकींचा रावण, इतिहासातील रावण, लंकाधिपती असलेला रावण हा एकीकडे आणि भगवान महादेवांचा शिवभक्त असलेला रावण एकीकडे. असं असताना या चित्रपटात हे कार्टून कशासाठी? बॉलिवूडमधील कोणी संशोधन करत नाही का, असा सवालही त्यांनी विचारला आहे. या चित्रपटातील सैफचा लूक फारच हास्यास्पद आहे. काळ्या रंगाचे कपडे घातलेला सैफ यात अत्यंत भयानक दिसतो आहे. गंमत म्हणजे, पुष्पक विमानऐवजी यात सैफ चक्क वटवाघुळावर बसलेला दिसतो आहे. त्याचा हा लूक नेटिझन्सना अजिबात आवडलेला नाही. ट्विटरवरही त्याच्या लूकची खिल्ली उडवली जात आहे.
ओम राऊत हा या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. त्याने ज्या पद्धतीने रावणाचे चित्रीकरण केले आहे, तो मूळ रामायणातील रावणापेक्षा फारच वेगळा आहे. या टीझरमध्ये दाखवलेली लंका देखील वेगळी दिसते आहे. या चित्रपटाचे व्हीएफएक्स अत्यंत हास्यास्पद वाटते आहे. रामायणावर आधारित या चित्रपटात अभिनेता प्रभास श्रीरामाच्या भूमिकेत आहे. क्रिती सेनॉन सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. तर देवदत्त नागे हनुमानाच्या भूमिकेत आहे. १२ जानेवारी २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित आहे.
Saif Ali Khan Troll Aadipurush Look Critic