मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृतसेवा
बॉलिवूड अभिनेत्री अमृता सिंगने तिच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक प्रसिद्ध चित्रपट दिले आहेत. मात्र आज ती कोणत्याही चित्रपटात दिसत नाही. मात्र पूर्वी अमृता सिंगने अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केले असून अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अमृता सिंगचा जन्म 9 फेब्रुवारी 1958 रोजी एका धनसंपन्न कुटुंबात झाला. अमृता सिंगची आई रुखसाना सुलताना या त्यांच्या काळात युवक काँग्रेसच्या मोठ्या नेत्या होत्या. अमृता सिंगचे वडील पंजाबी व्यवसायिक आहेत. अमृता सिंगने 1983 मध्ये ‘बेताब’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपला प्रवास सुरू केला. या चित्रपटात त्यांच्यासोबत धर्मेंद्र यांचा मुलगा अभिनेता सनी देओल मुख्य भूमिकेत होता. ‘बेताब’ हा चित्रपट अमृता सिंग आणि सनी देओल या दोघांचा डेब्यू चित्रपट होता. या जोडीने पडद्यावर चांगलीच खळबळ उडवून दिली आणि ‘बेताब’ हा चित्रपट हिट ठरला. यानंतर अमृता सिंगने ‘मर्द’, ‘बेताब’, ‘सनी’, ‘चमेली की शादी’, ‘साहेब’, ‘खुदगर्ज’, ‘नाम’ असे अनेक हिट सिनेमे दिले. अमृता सिंग 90 च्या दशकात तिच्या करिअरच्या शिखरावर होती. त्यावेळी तिने आपल्यापेक्षा 12 वर्षांनी लहान असलेल्या सैफ अली खानसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
सैफ अली खान चित्रपटसृष्टीत संघर्ष करत होता. अमृता सिंगसोबत त्यांची पहिली भेट 1992 मध्ये झाली होती. सैफ अली खानने ‘बेखुदी’ चित्रपटातून पदार्पण केले. ‘बेखुदी’ चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल रवैल यांनी केले होते जो अमृता सिंगचा जवळचा मित्र होता. अमृता सिंगने ‘बेखुदी’ चित्रपटाच्या स्टारकास्टसोबत फोटोशूट करावे, अशी राहुल रवैलची इच्छा होती. या परिस्थितीत या फोटोशूटदरम्यानच अमृता सिंग आणि सैफ अली खान यांची पहिली भेट झाली. फोटोशूटनंतर दोघेही हळूहळू मित्र बनले आणि एकमेकांच्या घरी जाऊ लागले. काही काळ डेट केल्यानंतर अमृता सिंग आणि सैफ अली खान यांनी लग्न केले. या लग्नापासून त्यांना सारा अली खान आणि इब्राहिम ही दोन मुले झाली.
आई झाल्यानंतर अमृता सिंग हळूहळू चित्रपटाच्या पडद्यापासून दूर गेली. दीर्घ गॅपनंतर ती काही चित्रपटांमध्ये दिसायला लागली. अमृता सिंग ही अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नो यांच्या बदला चित्रपटात दिसली होती. मात्र अमृता सिंग सध्या मोठ्या पडद्यापासून दूर आहे. सुमारे 14 वर्षांनंतर अशीही वेळ आली की, अमृता सिंग आणि सैफ अली खान यांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दोघेही 2004 मध्ये वेगळे झाले. विभक्त झाल्यानंतर दोन्ही मुले अमृता सिंगसोबत राहतात.