इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
उत्तर प्रदेशमध्ये १४ मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवल्या गेल्यानंतर त्याचे पडसाद आता सर्वत्र उमटत असतांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी साईबाबांना नाकारणं हे सनातन धर्माच्या रक्षणासाठी नसून धार्मिक असहिष्णुतेचा अजेंडा पुढे नेणारी कृती असल्याचे म्हटले आहे.
त्यांनी सांगितले की, मानवता, करुणा आणि एकता ही शिकवण देणाऱ्या साई बाबांना धर्माच्या चष्म्यातून पाहणाऱ्यांची खरंच कीव येते. उत्तर प्रदेशातील १४ मंदिरांमधून साईबाबांच्या मूर्ती हटवल्या गेल्या, ही अत्यंत क्लेषदायी घटना कानावर आली. हे हिंदू धर्माच्या खऱ्या तत्वाच्या अगदी विरोधात आहे. हिंदू धर्म आपल्या सर्वसमावेशकता आणि स्वीकृतीसाठी ओळखला जातो. अध्यात्मिक विचार आणि आचरणात विविधता स्वीकारणारा हिंदू धर्म आहे. महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात पूज्य असलेल्या साईबाबांचा सनातन धर्माशी संबंधच नसल्याचा दावा करणं ही श्रद्धा नव्हे तर द्वेष आहे. लाखो-करोडो साईभक्तांच्या मनाला ठेच पोहोचवणाऱ्या या संस्थेविरोधात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गंभीर दखल घेऊन कडक कारवाई करायलाच हवी.
साईबाबांना नाकारणं हे सनातन धर्माच्या रक्षणासाठी नसून धार्मिक असहिष्णुतेचा अजेंडा पुढे नेणारी कृती आहे. आपण अशा घटनांविरोधात उभं राहणं गरजेचं आहे. अन्यथा, आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे रूपांतर केवळ कट्टरता आणि द्वेषात होईल असेही आ. आव्हाड यांनी सांगितले.