शिर्डी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यावर्षी १३ फेब्रुवारी २०२५ रोजी होणाऱ्या श्री साईबाबा शिर्डी परिक्रमा महोत्सवात साईभक्तांना कोणतीही असुविधा होऊ नये, यासाठी शासकीय विभागांनी समन्वय साधावा आणि महोत्सव यशस्वी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिल्या. यंदाच्या परिक्रमा महोत्सवात कर्णकर्कश्श आवाजात संगीत वाजविणाऱ्या ध्वनिक्षेपकांना (डीजे) बंदी असणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
ग्रीन ॲण्ड क्लिन शिर्डी फाऊंडेशन, शिर्डी ग्रामस्थ व विविध सामाजिक संघटनांच्यावतीने आयोजित केल्या जाणाऱ्या परिक्रमा महोत्सवाच्या तयारीचा आढावा अपर जिल्हाधिकारी श्री.कोळेकर यांनी घेतला. याप्रसंगी शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे, श्री साईबाबा संस्थानचे प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले, राहाता नायब तहसीलदार हेमंत पाटील, पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, ग्रीन ॲण्ड क्लिन शिर्डीचे अजित पारख, जितेंद्र शेळके, अनिल शेजवळ, किरण सोनवणे आदी उपस्थितीत होते.
श्री.कोळेकर म्हणाले, परिक्रमा महोत्सवात कर्णकर्कश्श आवाजात डीजे वाजविणाऱ्यांवर बंदी राहणार असून पोलीस विभागाने याकडे लक्ष ठेवावे. परिक्रमेच्या १४ किलोमीटर मार्गावर असलेल्या गावांतील ग्रामपंचायतींनी स्वच्छतेची जबाबदारी घ्यावी. प्रकाश व्यवस्था सुनिश्चित करावी आणि स्वागत कमानी उभाराव्यात. नगरपरिषदेने परिक्रमामार्गावर स्वच्छतेसाठी स्वच्छता कर्मचारी नेमण्यात यावेत, साईबाबा संस्थान व नगरपरिषदेने फिरते स्वच्छतागृह व पाण्याच्या टँकरची व्यवस्था करावी.
रूई आणि साकुरी या गावातील वीटभट्ट्यांमधून निघणाऱ्या धूरामुळे साईभक्तांना त्रास होतो त्यामुळे परिक्रमेच्या दोन दिवस आधी व परिक्रमाच्या दिवशी या वीटभट्ट्या बंद ठेवण्याचे आदेश द्यावेत. परिक्रमा मार्गावर असलेल्या साईडपट्ट्यांची दुरूस्ती करण्यात यावी. उघड्या ड्रेनेजवर त्वरित झाकण बसविण्याची कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
साईबाबा संस्थान, तालुका आरोग्य अधिकारी तसेच खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या सहकार्याने वैद्यकीय पथके तैनात करण्यात यावीत. पोलीस विभागाने सतर्क राहून कायदा -सुव्यवस्थेबाबत दक्षता घ्यावी. वाहतूक पोलीसांनी परिक्रमा मार्गाला अडथळा होणार नाही, यादृष्टीने पर्यायी मार्गाने वाहतूक वळवावी, येणाऱ्या भक्तांसाठी परिक्रमेच्या चारही बाजूस मोकळ्या जागांमध्ये वाहन पार्किंगची व्यवस्था करावी. महावितरण विभागाने परिक्रमाकाळात विद्युत पुरवठा खंडीत होणार यांची दक्षता घ्यावी, असेही श्री.कोळकर म्हणाले. बैठकीला महसूल, पोलीस, आरोग्य, नगरपरिषद, महावितरण, ग्रामपंचायत या शासकीय विभागाचे अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते.