नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सत्त्व फाउंडेशन, पुणे आणि सह्याद्री रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील मोहाडी क्लस्टरमधील १६ गावांच्या सर्वांगीण ग्रामविकासाच्या कार्यक्रमांचा शुभारंभ बुधवार दि. १९ ऑक्टोबर रोजी सह्याद्री फार्म्स, मोहाडी येथे (सकाळी १०.३० वा. )होणार आहे.
या कार्यक्रमास नाशिक विभागाचे विभागीय महसूल आयुक्त श्री. राधाकृष्ण गमे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल तसेच सत्त्व फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत दळवी (निवृत्त आयएएस, माजी विभागीय आयुक्त पुणे विभाग), सह्याद्री फार्म्सचे चेअरमन श्री. विलास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असेल. संबंधित सोळा गावांचे प्रतिनिधी देखील उपस्थित राहाणार आहेत.
या कार्यक्रमात सर्वांगीण सर्वांगीण ग्रामविकासासाठी तयार करण्यात आलेला ग्रामविकास आराखडा (व्हिलेज डेव्हलपमेंट प्लॅन) आणि त्रिपक्षीय करारावर (Tripartite Agreement) सत्त्व फाउंडेशन, पुणे, सह्याद्री रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन, नाशिक आणि संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच आणि उपसरपंच यांच्या स्वाक्षऱ्या करण्याचा आणि उपस्थितांना मार्गदर्शन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी खालील मान्यवर उपस्थित राहाणार आहेत.
सह्याद्री क्लस्टर ग्रामविकास कार्यक्रमाची पार्श्वभूमी
सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने कृषी क्षेत्रात केलेल्या कार्यासोबतच सह्याद्री क्लस्टरमधील गावांच्या विकासाचा मुद्दा सह्याद्रीचे चेअरमन श्री. विलास शिंदे यांच्या मनात होता. या गावांमध्ये सह्याद्री रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या वतीने छोटे-मोठे उपक्रम आणि कार्यक्रम सुरू होते. त्याला व्यापक स्वरूप देण्याची गरज लक्षात आली. गावांमधील पायाभूत सुविधा व अन्य विकासकामे होण्यासाठी पुण्याचे तत्कालीन विभागीय आयुक्त श्री. चंद्रकांत दळवी यांच्यापुढे सह्याद्रीच्या वतीने हा विचार मांडण्यात आला. श्री. विलास शिंदे यांच्या निमंत्रणानंतर श्री. दळवी यांनी सह्याद्री क्लस्टरमधील गावांना २०१७ मध्ये भेट दिली. २०१७ – १८ मध्ये या १६ गावांतील निवडक लोकांनी श्री. विलास शिंदे यांच्यासह श्री. दळवी यांच्या निढळ, जि. सातारा या आदर्शगावाचा अभ्यास दौरा केला.
दरम्यान श्री. दळवी यांनी २०१८ साली निवृत्तीनंतर ग्रामविकास कामासाठी स्ट्रॅटेजिक अलायन्स फॉर ट्रान्सफॉर्मिंग व्हिलेजेस (SATV) म्हणजेच सत्त्व फाउंडेशन या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली. सत्त्व फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकास समितीच्या सदस्यांच्या तसेच ग्रामस्थांच्या अनेक बैठकी होत होत्या. पुढच्या टप्प्यात गावांचा प्राथमिक सर्व्हे सर्व ग्रामपंचायतीची क्लस्टरमध्ये सहभागी होण्यासाठी मंजुरी घेण्यात आली. सन २०१८-१९ मध्ये सत्त्व फाउंडेशनने क्लस्टर आराखडा तयार केला व त्याच्या अंमलबजावणीसाठी सह्याद्री फाउंडेशनच्या सहकार्याने ग्रामविकास समित्या स्थापन करण्यात आल्या. १८ऑक्टोबर २०२० रोजी आढावा बैठक संपन्न ग्रामविकास आराखडे (व्हिलेज डेव्हलपमेंट प्लॅट) बनवण्यास सुरवात करण्यात आली.
दरम्यान करोना संकटामुळे दोन वर्षे या कामात अडचणी आल्या. प्रत्यक्ष फिल्डवरील काम बंद असले तरी ऑनलाइन बैठकींच्या माध्यमातून काम पुढे जात होते. ९ मार्च २०२२ रोजी ग्रामविकास आराखडे तयार करून त्यास ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभेत मंजुरी घेण्यात आली.
सह्याद्री क्लस्टर ग्रामविकास आराखड्यातील घटक
गावांच्या विकासाचे अनेक पैलू आहेत. गावात सर्व प्रकारच्या सुविधा निर्माण करणे, गावातील प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न वाढवत त्यांचे राहणीमान सुधारणे, गावातील मुलं, विद्यार्थी, महिला, मागासवर्गीय यांच्या कल्याणाचे कार्यक्रम राबविणे, व्यसनाधीनता कमी करून व्यसनमुक्तीकडे मार्गक्रमण करणे, सांस्कृतिक व र्मक सदाचरण र्माण करणे. या सर्व बाबींचा समावेश ग्रामविकासामध्ये सत्त्व फाउंडेशनला अभिप्रेत आहे. त्याकरिता सत्त्व फाउंडेशनच्या दृष्टीने गावांच्या विकासाचे तीन मुख्य घटक आहेत.
१) भौतिक विकास
गावामध्ये सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा निर्माण करावयाच्या कामांचा समावेश भौतिक विकासामध्ये केला आहे. जोड रस्ते, गावांतर्गत रस्ते, पिण्याचे पाणी, घनकचरा व सांडपाणी व्यवस्था, शिक्षण व आरोग्य सुविधा, वीजपुरवठा, पाटबंधारे व जलसंधारण, शेतासाठी पाण्याची उपलब्धता आणि उपलब्ध पाण्याचा कटाक्षाने वापर, पशुसंवर्धन व दुग्धविकासासाठी पायाभूत सुविधा, वनविकास व वृक्ष लागवड, संस्थात्मक संरचना आणि संस्थांच्या इमारती, सामाजिक सभागृहे, मागासवर्गीय वस्त्यांचा विकास इत्यादींचा समावेश गावांच्या भौतिक विकासामध्ये करण्यात आला आहे. या कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असते. केंद्र शासन, राज्य शासन, आणि पंचायत राज संस्थांमधील विविध योजना आणि त्या अंतर्गत उपलब्ध होणार्या निधीमधून ही सर्व विकासकामे करता येतात. विविध योजनांची एकत्रित आणि गुणवत्तापूर्ण अंमलबजावणीतून परिपूर्ण भौतिक विकास साधता येतो.
२) आर्थिक विकास
गावातील शेतकरी, शेतमजूर, आणि भूभूमिहीनांचे कौटुंबिक उत्पन्न वाढविणे आणि पर्यायाने गावाचा आर्थिक स्तर उंचावण्याच्या कामांचा आर्थिक विकास या घटकामध्ये समावेश केला आहे. गावाच्या शेतीचा विकास हा प्रामुख्याने गावाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे. पाण्याची उपलब्धता असलेली आणि पाणी कमी उपलब्ध असलेली असे गावांचे दोन प्रमुख भाग पडतात. शेतीसाठी पुरेसे पाणी उपलब्ध असल्यास त्याचा अधिक शेती उत्पन्नासाठी काटेकोर वापर आणि ज्या गावांना शेतीसाठी पुरेसे पाणी नाही अशा गावामध्ये मृद व जलसंधारण, पाणलोट विकास, वनविकास आणि वृक्ष लागवडीची कामे करून पावसाचा थेंब न् थेंब अडवून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढविण्याची कामे करणे आवश्यक ठरते. यासाठीच्या सर्व प्रकारच्या कामांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची एकत्रित व गुणवत्तापूर्ण मलबजावणी करून ही उद्दिष्ट्ये साध्य करता येतात.
पाण्याच्या उपलब्धतेनंतर पीक पद्धतीत बदल करणे, सूक्ष्म जलसिंचन व्यवस्था अनुरसणे, उत्पादनाची साठवण, प्रोसेसिंग आणि विक्री करून प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न वाढविणे, यांचा समावेश आर्थिक विकासामध्ये येतो. शेतीला जोडधंद्याची साथ देण्याची आवश्यकता आहे. पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय प्रत्येक शेतकरी आणि बिगर शेतकरी कुटुंब करू शकते. शेती विकसित होताना पशुसंवर्धन व दुग्धविकास साधणे कुटुंबांना शक्य होते. अशा प्रकारे शेतीचा विकास, पशुसंवर्धन आणि दुग्धविकासामार्फत प्रत्येक कुटुंबाचा व गावाचा आर्थिक विकास साधता येतो.
केंद्र आणि राज्य शासनाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना पात्रतेप्रमाणे कुटुंबास मिळवून देणे हा या कामासाठी निधीचा प्रमुख स्रोत आहे. शेतीपूरक व्यवसायाव्यतिरिक्त इतर व्यवसाय, उद्योग, पात्रतेप्रमाणे तरुणांनी नोकर्या मिळविणे याद्वारेही आर्थिक विकास साधता येतो. शेती, शेतीपूरक व्यवसाय व बिगरशेती व्यवसायासाठी पतपुरवठ्याची व्यवस्था निर्माण करणे, ही आर्थिक विकासासाठीची आवश्यक बाब ठरते. महिलांचा आर्थिक विकासात सहभाग करून घेण्यासाठी महिला बचतगटामार्फत महिलांना संघटित करून त्याच्यामार्फत उत्पन्नवाढीचे उपक्रम राबविणे हेही आर्थिक विकासासाठी आवश्यक आहे.
३) मानव विकास
भौतिक विकासामध्ये प्रत्येक नागरिकास सहभागी करून घेणे आणि आर्थिक विकासाचा कुटुंबनिहाय विचार करणे जास्त महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे गावातील महिला, मुलं, विद्यार्थी, तरुण, वृद्ध, शेतकरी, व्यावसायिक आणि मागासवर्गीयांच्या कल्याणाचा समावेश मानव विकासामध्ये करण्यात आला आहे. यासाठीच्या शासनाच्या सर्व स्तरातील लोकांसाठी वैयक्तिक लाभाच्या व सामाजिक सुरक्षेच्या योजना आहेत. त्यांचा लाभ संबंधित घटकास मिळवून देणे हा मानव विकासाचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे.
त्याचबरोबर गावाने पुढाकार घेऊन प्राथमिक व माध्यमिक शिक्षण गुणवत्तापूर्ण मिळवून देणे, तरुण मंडळांची स्थापना करून त्यांच्या मार्फत विविध सामाजिक आणि राष्ट्रीय उपक्रम राबविणे, गावाचा सांस्कृतिक ठेवा वृद्धिंगत करणे, आध्यात्मिक विकासामध्ये लोकांना गोडी निर्माण करण्यासाठीचे उपक्रम राबविणे, गावातील अनिष्ट चालीरीती, परंपरा, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्तीचे कार्यक्रम राबविणे, गावातील पुढील पिढी सदाचारी, सद्विचारी आणि उपक्रमशील घडविण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेणे, प्रबोधनाचे कार्यक्रम आयोजित करणे आणि त्यासाठी विविध उपक्रम राबविणे याचा मानव विकासामध्ये समावेश केलेला आहे. या घटकाच्या अंमलबजावणीसाठी लोकसहभाग, लोकवर्गणी आणि श्रमदान यांची लोकसंस्कृती गावामध्ये निर्माण करणे आवश्यक ठरते.
Sahyadri Rural Development Foundation Work