नाशिक – येथे होत असलेल्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पत्रिकेत नावावरून निर्माण झालेल्या वादाला पूर्णविराम मिळाला आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी संमेलनावर बहिष्कार टाकल्यानंतर त्याची गंभीर दखल स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी घेतली. त्यामुळेच त्यांनी स्वतः महापौर सतीश कुलकर्णी आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. त्यामुळे आता भाजप नेते संमेलनात सहभागी होणार असल्याची माहिती भुजबळांनी दिली आहे.
स्वागताध्यक्ष भुजबळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे शनिवारी साहित्य संमेलनास उपस्थित राहणार आहेत. तर महापौर सतीश कुलकर्णी साहित्य संमेलनात सक्रिय सहभाग नोंदविणार आहेत. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री, नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व महापौर सतीश कुलकर्णी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करत त्यांच्याशी चर्चा केली. या दोघांनीही साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे सांगितले आहे.
भुजबळ म्हणाले की, नाशिकमध्ये होणाऱ्या साहित्य संमेलनास नाशिक महानगरपालिकेकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जात आहे. संमेलनासाठी निधी देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. नाशिकचे साहित्य संमेलन हे आपणा सर्वांचे साहित्य संमेलन असून सर्वांच्या सहभागाशिवाय हे यशस्वी होणार नाही. त्यामुळे नाशिककर म्हणून संमेलन यशस्वी करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. तसेच महापौर म्हणून संमेलनासाठी येणाऱ्या सगळ्या पाहुण्यांचे स्वागत करावे लागणार आहे. त्यामुळे आपण या संमेलनात सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी महापौर सतीश कुलकर्णी यांना केले. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा शनिवारी साहित्य संमेलनास उपस्थित राहणार असल्याचे भुजबळांना सांगितले. तर महापौर सतीश कुलकर्णी हे कार्यक्रमांत सहभागी राहणार असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे.