नाशिक – ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे सर्वार्थाने उत्कृष्ट आणि संस्मरणीय होईल असा विश्वास या संमेलनाचे स्वागताध्यक्ष ना. छगन भुजबळ यांनी आज व्यक्त केला. संमेलनाच्या विविध समित्यांच्या सदस्यांच्या सभा संमेलन स्थळ कुसुमाग्रज नगरी, भुजबळ नॅालेज सिटी येथे एकूण तयारीच्यादृष्टीने झाल्यानंतर सर्वांना संबोधित करताना ते बोलत होते. पहिल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष निफाडचे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे होते. याची आठवण जागवत कुसुमाग्रज नगरीत होणारे हे संमेलन सर्व बाबतीत उच्च दर्जाचे व्हावे यासाठी आपण कंबर कसली आहे. हे आजच्या आपल्या मोठ्या सहभागावरुन दिसून येते ही आश्वासक बाब आहे. संमेलन आधी गोखले एज्युकेशन सोसायटी प्रांगणात होणार होते व तेथेही आपल्याला त्यांचे सहकार्य मिळाले होते. त्याबद्दल आपण आभारी आहोत. आता संमेलन भेट भुजबळ नॅालेज सिटी येथे घेण्याचा निर्णय झाला. त्यामुळे कमी वेळात वेगाने आपल्याला तयारी करावी लागणार आहे. त्यासाठी सर्व सहकार्य मिळेल असेही त्यांनी स्पष्ट केले. नाशिक महानगरातील चहुबाजूने लोकांना येता येईल यासाठी बसेसची व्यवस्था केली असून मोठ्या संख्येने नागरिकांनी संमेलनात सहभागी व्हावे असे आवाहन केले.
कोणतेही काम हातात घेतले की ते सर्वोत्कृष्ट करायचे हा स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांचा स्वभाव असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हे संमेलन यशस्वी करु आणि संमेलन घ्यावे ते नाशिककरांनी असे सर्व म्हणतील असे करु असे आवाहन कुसुमाग्रज यांची आठवण जागवत कार्याध्यक्ष हेमंत टकले यांनी केले. सुरुवातीला समिती समन्वय विश्वास ठाकूर यांनी स्वागत केल्यावर प्रमुख सचिव जयप्रकाश जातेगावकर यांनी प्रास्ताविकातून कामाचा आढावा घेऊन सर्व नाशिककरांचे हे संमेलन यशस्वी करण्यासाठी झटून प्रयत्न करु अशी ग्वाही दिली.
मुख्य समन्वयक समीर भुजबळ यांनी सर्व समित्यांनी केलेल्या सूचनांचा विचार करुन एकूण आखणी केली जाईल व सर्वांनी ही सामुहिक जबाबदारी उत्तमरितीने पार पाडू असे विचार व्यक्त केले. शेवटी सहकार्याध्यक्ष मुकुंद कुलकर्णी यांनी आभार मानले. यावेळी लोकहितवादी मंडळाचे व संमेलन पदाधिकारी, समिती प्रमुख आणि सदस्य उपस्थित होते.